नंदुरबार : महाराष्ट्रातील अनेक भागात पावसानं धुमाकूळ घातला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात पावसाने 5 जणांचा मृत्यू झाला आहे, तर सहाजण बेपत्ता आहेत. सध्या परिसरातील तब्बल 300 च्यावर घरांची पडझड झाली आहे. तसेच 45 जनावरे देखील दगावली आहेत.


नवापुर तालुक्यात शुक्रवारी पहाटे 140 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दुसरीकडे विसरवाडी परिसरातील वाडी शेवाडी प्रकल्पाला भगदाड पडल्याने सरपणी नदीला पूर आला आहे. या पुराच्या पाण्यात वंतीबाई बोधल्या गावित या महिलेचा मृत्यू झाला आहे. रंगावली नदी सकाळच्या सत्रात धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याने नवापूर शहारातील अनेक घरांमध्ये पाणी शिरुन संसार उपयोगी वस्तू आणि गाड्या वाहून गेल्या.


चिंचपाडा येथे देखील एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. या तिघांच्या मृत्यूसह नवापूर शहरातील मिनाबाई कासार आणि वाघाळीपाडा येथील काशीराम गावित हे दोघेजण बेपत्ता आहेत. प्रशासन आणि त्यांचे नातेवाईक त्यांचा शोध घेत आहेत. पुराच्या पाण्यामुळे नवापूर तालुक्याचा रात्रीपासून वीज पुरवठा खंडीत झाला आहे.


रात्रीपासून पाणाबारा गावाजवळ पूल खचल्याने अमरावती-सुरत महामार्गावरची वाहतूक विसरवाडीपासून नंदुरबारकडे वळवण्यात आली. या पाण्याने तालुक्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पशुधनाच्या मृत्यूचीही मोठे आकडेवारी समजत आहे. जिल्हा प्रशासनाने पुरात अडकलेल्या अनेकांची सुटका केली असून युद्ध पातळीवर बचावकार्य आणि नुकसानीचे पंचनामे सुरु केले आहेत.