औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्याचा प्रस्ताव महापौरांनी मांडला. मात्र या प्रस्तावास एमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीन याने विरोध दर्शवला. त्यावरून शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांनी सय्यद मतीनला चपलेने तसंच लाथा-बुक्क्यांनी बेदम मारलं.
या मारहाणीनंतर सय्यद मतीन याचं नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी इतर नगरसेवकांनी केली. यानंतर संतप्त झालेल्या एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी महापालिका मुख्यालयासमोरील भाजप संघटना मंत्र्यांच्या गाडीची तोडफोड केली. तोडफोड केल्याप्रकरणी नगरसेवकासह एमआयएमच्या 100 कार्यकर्त्यांविरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही पक्षाची भूमिका नाही : इम्तियाज जलील
श्रद्धांजली वाहण्याच्या प्रस्तावाला विरोध करणं ही एमआयएमची भूमिका नाही, ते सय्यद मतीन यांचं वैयक्तिक मत होतं, असं स्पष्टीकरण एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी दिलं. एमआयएम या नगरसेवकाच्या पाठीमागे उभं राहणार नसून याला समर्थन देणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.
वंदे मातरमलाही विरोध
दरम्यान, सय्यद मतीन याच नगरसेवकाने वंदे मातरम म्हणण्यावरुनही महापालिकेच्या सभागृहात राडा घातला होता, असं भाजपच्या नगरसेवकांनी सांगितलं. याअगोदर दोन ते चार वेळा सय्यद मतीनने काही ना काही कारण काढून गोंधळ घातल्याचं नगरसेवकांचं म्हणणं आहे.
पाण्याच्या प्रश्नावरुनही सय्यद मतीनने महापौरांना खुर्ची फेकून मारली होती. त्यामुळे त्याचं नगरसेवकपद रद्द करण्याचा प्रस्ताव यापूर्वीच सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे, अशी माहिती नगरसेवकांनी दिली.
व्हिडीओ :