राज्य सरकारने जाहीर केलेला दुष्काळ केंद्राच्या संहितेप्रमाणे नाही
एबीपी माझा वेब टीम | 01 Nov 2018 04:35 PM (IST)
केंद्राच्या दुष्काळ संहितेनुसार दुष्काळ जाहीर न केल्यामुळे केंद्राकडून राज्याला मिळणाऱ्या मदत निधीमध्ये अडचण येऊ शकते.
फाईल फोटो
मुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेला दुष्काळ हा केंद्र सरकारच्या दुष्काळ संहितेप्रमाणे नसल्याचं समोर आलं आहे. राज्य सरकारने जाहीर केलेला दुष्काळ केंद्राच्या संहिता 16 प्रमाणे नसल्याची कबुली खुद्द राज्य सरकारच्या वकिलांनी उच्च न्यायालयात दिली आहे. या प्रकरणी संजय लाखे पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. केंद्राच्या दुष्काळ संहितेनुसार दुष्काळ जाहीर न केल्यामुळे केंद्राकडून राज्याला मिळणाऱ्या मदत निधीमध्ये अडचण येऊ शकते. राज्य सरकारने केंद्र सरकारच्या दुष्काळ मॅन्युअलनुसार आज राज्यातल्या आणखी 250 मंडळात दुष्काळ जाहीर केला. काल रात्री सरकारने 151 तालुक्यात गंभीर आणि मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला होता. 112 तालुक्यांमध्ये गंभीर स्वरुपाचा, तर 39 तालुक्यांत मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर झाला आहे. संहिता 16 काय सांगते? संहिता 16 नुसार 30 ऑक्टोबरपूर्वी पेरणी, पावसाचा पडलेला खंड, हवेतील आर्द्रता आणि पीक परिस्थिती कशी आहे, याची पाहणी करण्यासाठी राज्य सरकारने दुष्काळ नियंत्रण कक्ष उभारला पाहिजे, त्याला कर्मचारी वर्ग दिला पाहिजे. या नियंत्रण कक्षाने सर्व बाबींची पाहणी करुन राज्य दुष्काळ नियंत्रण समितीला दिले पाहिजे, असंही संहिता सांगते राज्यात दुष्काळ नियंत्रण कक्ष उभारणे बंधनकारक असताना राज्य सरकारने तो उभारला नाही. त्यामुळे संहितेनुसार प्रत्येक जिह्यातील परिस्थितीची पाहणी झालेली नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी दरमहा जिल्हा दुष्काळ निवारण समितीची बैठक घ्यायला हवी, पण अशी बैठक झालेली नाही मंत्रालयातून अहवाल तयार करण्यात आल्यामुळे एका तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला, तर बाजूच्या तालुक्यात दुष्काळ नाही. कोर्टात आज राज्यातील दुष्काळ परिस्थितीबाबत सुनावणी झाली असता, संहितेप्रमाणे आम्ही दुष्काळ जाहीर केला नाही, कॅबिनेटची मान्यता घेऊन दुष्काळ जाहीर करु, असं सरकारी वकिलांनी सांगितलं.