मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 19 ते 30 नोव्हेंबरपर्यंत मुंबईत होणार आहे. दुष्काळासह राज्यातील अनेक समस्यांनी उग्र रूप धारण केले असताना केवळ 9 दिवस हिवाळी अधिवेशन घेण्याच्या या निर्णयावर विरोधकांनी कडाडून टीका केली आहे तर दोन आठवडे अधिवेशन होणार असून विरोधकांनी गोंधळ न घालता सर्व विषयावर चर्चा करावी त्यास आम्ही तयार आहोत, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
विधानभवनात कामगार सल्लागार समितीची बैठकीत हिवाळी अधिवेशन 19 ते 30 नोव्हेंबरपर्यंत मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. हे अधिवेशन 2 आठवडे चालणार असून कामकाज फक्त 9 दिवस चालणार आहे. गुरुनानक जयंतीच्या दिवशी सुट्टीदिवशीही कामकाज चालणार आहे.
दरम्यान अधिवेशनाचा कालावधी वाढवावा अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. दुष्काळावरची चर्चा टाळण्यासाठी अधिवेशनाचा कालावधी कमी केला. हे सरकार पळपुट्यांचे आहे, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे.
दरवर्षी हिवाळी अधिवेशन 1 डिसेंबर ते 25 डिसेंबर असते, पण ईद-ए-मिलाद आणि गुरू नानक जयंती बघून या सरकारने फक्त दोन आठवड्याचे अधिवेशन घेतले, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
संसदीय कामकाज मंत्री गिरीष बापट यांनी हे दोन आठवडे अधिवेशन होणार असल्याचे सांगत विरोधकांनी गोंधळ न घालता सर्व विषयावर चर्चा करावी त्यास आम्ही तयार आहोत, असे म्हटले आहे. आवश्यकता पडली तर अधिवेशनाचे दिवस वाढवायला तयार आहोत. सुट्टीच्या दिवशी ही कामकाज होईल, असेही बापट म्हणाले.