जळगाव : जळगाव जिल्ह्यातील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. पी.पी. पाटील यांनी यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिलेला राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वीकारला आहे. प्रभारी कुलगुरू म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 8 मार्चला डॉ. वायुनंदन हे पदभार स्वीकारतील.


कुलगुरू प्रा. पी.पी. पाटील यांनी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रकृती अस्वास्थ्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे कुलगुरू पदाचा राजीनामा पाठवला होता. हा राजीनामा स्वीकारला असल्याचे राजभवनाचे पत्र विद्यापीठाला प्राप्त झाले आहे. त्यामुळे 8 मार्चपासून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांच्याकडे प्रभारी कुलगुरूपदाचा पदभार देण्यात येत असल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. प्रा. पी.पी. पाटील यांचा कार्यकाळ 25 ऑक्टोबर, 2021 रोजी संपुष्टात येणार होता.


प्रा. पी.पी. पाटील यांनी 26 ऑक्टोबर, 2016 रोजी विद्यापीठाचे सहावे कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारला होता. विद्यापीठाच्या भौतिकीयशास्त्र प्रशाळेत ते प्रोफेसर म्हणून कार्यरत होते. या प्रशाळेत ते 1991 मध्ये अधिव्याख्याता म्हणून रूजू झाले. दहावी पर्यंतचे त्यांचे शिक्षण यावल तालुक्यातील अंजाळे या मुळ गावी झाले. त्यानंतर पुणे येथील गरवारे महाविद्यालयात बी.एस्सी. आणि पुणे विद्यापीठात भौतिकशास्त्रात एम.एस्सी.ची पदवी विशेष प्राविण्यासह प्राप्त केली. जळगावच्या मुळजी जेठा महाविद्यालयात 1988 ते सप्टेंबर 1991 या काळात अधिव्याख्याता म्हणून त्यांनी काम पाहिले. 2008 मध्ये त्यांना राज्यशासनाचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला. कंडक्टिंग पॉलिमर्स, नॅनो कंपोझाईटर्स, गॅस सेन्सर्स, बॉयो सेन्सर्स आदी त्यांचे संशोधनाचे विषय राहीले आहेत.


प्रा. पी.पी. पाटील यांच्या कुलगुरूपदाच्या कार्यकाळात 11 ऑगस्ट 2018 रोजी विद्यापीठाच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असा नामविस्तार झाला. विद्यापीठाला सिलेज बेसड् एरीया डेव्हलपमेंट प्रोग्राम (CADP) या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, मुंबई यांच्याकडून 14 कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला व नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रात या प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. विद्यापीठातून उद्योजक निर्माण व्हावेत यासाठी इन्क्युबेशन सेंटरला 5 कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला. याशिवाय प्रा. पाटील यांच्या कार्यकाळात कुलगुरू-विद्यार्थी संवाद पर्वाला सुरूवात झाली. पीएच.डी. विद्यार्थ्यांची मौखिक परीक्षा झाल्यानंतर त्याच दिवशी त्यांना घोषणापत्र देण्याची पद्धत रूढ झाली. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी चार ठिकाणी विद्यार्थी सुविधा केंद्र सुरू करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर महिन्यात अंतीम वर्षाच्या सर्व परीक्षा ऑनलाईन पध्दतीने यशस्वीपणे पार पडल्यात. विद्यापीठात डिसेंबर 2017 मध्ये सुसज्ज असे ऑनलाईन परीक्षा केंद्र सुरु करण्यात आले. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार प्रा. पाटील यांच्या कार्यकाळात झाले.


प्रा. वायुनंदन यांचा परिचय


यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन हे प्रभारी कुलगुरू म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची सूत्रे 8 मार्चला स्वीकारणार आहेत. डॉ. वायुनंदन यांनी मार्च 2017 मध्ये मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची सूत्रे स्वीकारली आहेत. तत्पुर्वी ते इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात 1987 पासून कार्यरत होते. आपत्ती व्यवस्थापन या विषयात त्यांनी पदविका घेतली असून लोकप्रशासन या विषयात त्यांनी पीएच.डी. केली आहे. 25 वर्षाचा त्यांना अध्यापनाचा अनुभव आहे. पाच पुस्तके त्यांनी लिहीलेली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली चार विद्यार्थ्यांनी पीएच.डी.चे संशोधन पूर्ण केलेले आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध झालेले आहेत. प्रशासन, कामगार प्रशासन आणि सार्वजनिक धोरण हे त्यांचे संशोधनाचे विषय आहेत. आपत्ती व्यवस्थापना बाबतच्या विविध उपक्रमात त्यांनी बहुमोल योगदान दिलेले आहे.