मुंबई : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त आज दादरमधील चैत्यभूमीवर जनसागर लोटला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. आज सकाळी राज्यपाल सी विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चैत्यभूमीवर येत बाबासाहेबांना अभिवादन केलं. त्यानंतर विविध पक्षाचे नेते आणि उमेदवारांनीही चैत्यभूमीवर जात महामानवाला अभिवादन केलं.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त मुंबईसह राज्यभरात उत्साहाचे वातावरण आहे. ठिकठिकाणी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
मुंबईमध्ये ठिकठिकाणी जल्लोष करत अभिवादन
मध्यरात्रीपासूनच मुंबईमध्ये ठिकठिकाणी जल्लोष करत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले. दादर येथील चैत्यभूमीवर मध्यरात्रीपासूनच नागरिकांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यास गर्दी केली होती. तर दुसरीकडे मुंबईच्या वरळी बीडीडी चाळ परिसरात दक्षिण मुंबईचे महाआघाडीचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे , काँग्रेस नेते भालचंद्र मुणगेकर उपस्थित होते.
सोलापुरात जयंतीचा उत्साह
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा सोलापुरात मोठा उत्साह असतो. रात्री 12 वाजता नागरिकांनी जयभीमघोष केला. यावेळी पुष्प अर्पण करून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. विशेष म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी देखील आज सोलापुरात रात्री 12 वाजता आंबेडकर चौकात उपस्थिती लावत अभिवादन केले. यावेळी सुजात आंबेडकर, बसपाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे, आरपीआयचे नेते राजाभाऊ सरवदे, बाळासाहेब वाघमरे, दशरथ कसबे यांच्यासह शेकडो भीमसैनिक रात्री अभिवादनसाठी एकत्रित जमा झाले. या निमित्ताने बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. पुढील 7 दिवस सोलापुरात जयंती उत्सव सुरू राहिल. पुढील रविवारी जंगी मिरवणुकीने उत्सवाची सांगता करण्यात येणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर 128 व्या जयंतीचा उत्साह, चैत्यभूमीवर जनसागर लोटला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Apr 2019 07:00 AM (IST)
मध्यरात्रीपासूनच मुंबईमध्ये ठिकठिकाणी जल्लोष करत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले. दादर येथील चैत्यभूमीवर मध्यरात्रीपासूनच नागरिकांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यास गर्दी केली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -