मुंबई : उन्हामुळे अंगाची लाहीलाही झालेल्या मनमाड, सातारा आणि रत्नागिरीत आज पावसानं शिडकावा केला.सातारा जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये आज पावसाने हजेरी लावली. साताऱ्यातील वाई, पाचगणी, महाबळेश्वरमध्ये आज पाऊस पडला. त्यामुळे गरमीमुळे हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.


नाशिक जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. मेघ गर्जनेसह चांदवडमध्ये पाऊस झालाय. या पावसामुळे शेतात काढून ठेवलेले कांदे भिजले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. याशिवाय पिंपरीतही ढगांच्या कडकडाटासह पाऊस झाला आहे.


रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे आंब्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी, कुडाळ, कणकवली तालुक्यात रात्री विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला.


वैभववाडीत भुईबावडा, कुसूर, करुळ, कुर्ली, सडुरे, अरुळे, निमअरुळे, कोकिसरे, लोरे, आचिर्णे, खांबाळे आदी सह्याद्री पट्ट्यात तुरळक पाऊस झाला.