रायगड : एकचं धून सहा जून असं म्हणत दरवर्षी अखिल भारतीय राज्याभिषेक समितीच्या वतीने दरवर्षी सहा जूनला दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतो. या निमित्ताने देशभरातून हजारो शिवभक्त रायगडावर हजेरी लावतात. समितीचे मार्गदर्शक व शिवछत्रपतींचे वंशज श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती, युवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र, यंदा या सोहळ्यावर कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे यंदाचा शिवराज्याभिषेक घरीच राहुन साजरा करण्याचे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे.


शिवभक्तांच्या सहकार्याने 2008 ला मेघडंबरीत शिवछत्रपतींच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना झाली. दरवर्षी शिवभक्तांचा गडावर उपस्थितीचा आलेख उंचावत आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याला लोकोत्सवाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. देशभरातूनच नव्हे तर जगभरातून शिवभक्त रायगडावरील हा ऐतिहासिक सोहळा पाहण्यासाठी आणि त्याचा साक्षीदार होण्यासाठी आतुर झालेले असतात.


यंदाही हा ऐतिहासिक सोहळा मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचे ठरवले होते. सोहळ्याबाबत समितीचे पदाधिकारी व शिवभक्तांनी चर्चा करून जगभर पसरलेल्या कोरोना महामारीचे संकट पाहता समाजहीत डोळ्यासमोर ठेवून सोहळा अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्याचे नियोजन केले आहे. सोहळा साधेपणाने साजरा होणार आहे.


Lockdown 5.0 | राज्य सरकारची नियमावली जाहीर, कंटेनमेंट झोन वगळता अनेक निर्बंध शिथील


घरीच राहुन शिवराज्याभिषेक साजरा करा
यावर्षीचा शिवराज्याभिषेक घरात राहूनच विविध उपक्रमांनी साजरा करावा. स्वराज्याचे प्रतिक भगवा ध्वज घरासमोर लावावा, शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करावे, स्वदेशी जातीचे एखादे झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, शिवरायांवरील पुस्तकांचे वाचन करावे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत रायगडावर येण्याचा प्रयत्न करु नये, अशी विनंती युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.


शिवराज्याभिषेक लाईव्ह पाहता येणार?
छत्रपती संभाजीराजे यांनी 10 मे रोजी फेसबुकवर एक पोस्ट लिहली होती. यात सर्व शिवभक्तांना मी एकच शब्द देतो, की महाराजांचा राज्याभिषेक विधिवत पार पाडला जाईल. त्या परंपरेमध्ये खंड पडू देणार नाही. राजसदरेतील राज्याभिषेक सोहळा सर्व शिवभक्तांना थेट पाहता येईल याविषयी सुद्धा उपाय योजना करण्याचा माझा मानस आहे. सहा जूनचा सोहळा होणार हे नक्की.


Unlock MAH Guidelines | राज्यात तीन जूनपासून अनलॉक! पाहा महाराष्ट्रात काय सुरू काय बंद असणार