मुंबई : दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याशी एबीपी माझाने संवाद साधला. यावेळी पंकजा मुंडे यांनी राज्यावरचं कोरोनाचं संकट, विधानपरिषद निवडणूक अशा विविध विषयांवर भाष्य केलं. गोपीनाथ गडावर जायला परवानगी मिळाली असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र कार्यकर्त्यांनी गोपीनाथ गडावर एकत्र येऊ नये, असं आवाहन त्यांनी केलं आहे. लोकांनी एकत्र येऊ नये, त्यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. जिथे असाल तेथून गोपीनाथ मुंडे साहेबांना अभिवादन करा. फेसबूक, सोशल मीडियाच्या माध्यमातून गोपीनाथ गडावरील कार्यक्रम दाखवला जाईल. मुंडे साहेबांच्या आठवणीत स्त्री पुरुष समानतेच्या दृष्टीने दोन दिवे घरात लावा. तसेच कोरानाच्या पार्श्वभूमीवर समाजातील गरजू लोकांना मदत करा, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.


राज्यावरील कोरोना संकट आणि राज्य सरकारच्या उपाययोजना यावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, कोरोनाचं मुंबईवर संकट मोठं आहे. मुंबईची लोकसंख्या खुप जास्त आहे. याठिकाणी लोक कमी जागेत खुप दाटीवाटीनं राहतात. झोपडपट्ट्या आहेत. त्यामुळे मुंबईत कोरोनाशी लढा देण्याचं काम आव्हानात्मक आहे. राज्य सरकारने ज्या उपाययोजना केल्या आहेत, त्या आयोग्य आहेत असं नाही. मात्र अधित उपाययोजना करणे गरजेचं असून यातून बाहेर पडण्यासाठी जास्तीत जास्त तज्ज्ञ मंडळींशी बोलणे गरजेचं आहे. येत्या काळात रुग्णसंख्या वाढली तर तशी तयारी सरकारकडून होण्यासाठी पावलं उचलली गेली पाहिजेत. स्थलांतरही मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी स्थलांतरित लोकांची तपासणी झाली पाहिजे. कोरोनामध्ये लोकांचं सहकार्यही तितकच महत्त्वाचं आहे. सरकार आणि लोकांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.


केवळ राजकारण करु नये


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या राजकारणवर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी सध्या राजकारणात सक्रीय नाही, समजाकारणाकडे मी लक्ष केंद्रीत केलं आहे. केवळ राजकारण करण्याची आता गरज नाही. मात्र विरोधी पक्षाने विरोध करणेही गरजेचं आहे, नाहीतर सत्ताधारी पक्ष काय करत आहे हे समाजासमोर येणार नाही. सरकारी पक्षाने अविचलीतपणे काम करणे आवश्यक आहे. सरकार आणि विरोधक या दोन्ही पक्षांनी आपलं काम केलं पाहिजे, मात्र केवळ राजकारण करु नये.


विधानपरिषदेवर संधी मिळाली नाही म्हणून अपेक्षाभंग झाला नाही


विधानपरिषद निवडणुकीवर बोलताना त्या म्हणाल्या की, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतरही पंकजा मुंडे मंत्री होणार ही चर्चा होती. विधानपरिषदेत पंकजा मुंडेंना संधी मिळणार ही चर्चा तेव्हापासून सुरु होती. कोणतीही निवडणूक आली की पंकजा मुंडेंच्या नावाची चर्चा होते. विधानपरिषदेची घोषणा झाली त्यावेळी आम्ही काहीजण दावेदार होतो, त्यामुळे ती चर्चा झाली. मात्र विधानपरिषदेवर संधी मिळाली नाही, यामुळे अपेक्षाभंग अजिबात नाही झाला. कुठली गोष्ट मागणे हे जनतेतून आलेल्या माणसाला अवघड जातं. पण मला काहीही वाटलं नाही आणि मी पक्षाचा निर्णय मान्य केला.


Pankaja Munde EXCLUSIVE | कोरोनाच्या संकट काळात राजकारण करण्याची गरज नाही - पंकजा मुंडे