मुंबई : कोरोना, लॉकडाऊन आणि उन्हाळ्याचा उकाडा...या सर्व गोष्टी एकाच वेळी येऊन ठाकल्यामुळे आता ढगाकडे आशेनं पाहिलं जातंय. अशातच राज्यातील काही भागांमध्ये पावसाची सुरुवात झालेली आहे, कोल्हापूर आणि साताऱ्यात मुसळधार पाऊस बरसलाय, तर पुणे जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून कोथरूड, पिंपरी-चिंचवड परिसरात पावसाच्या तुरळक सरी जाणवल्या. तर कोकणसह मुंबई आणि ठाण्यात तीन ते पाच जूनदरम्यान पावसाचं आगमन होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
कोल्हापूर शहराला आज दुपारी जोरदार पावसाने झोडपलं, दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातच पावसाने हजेरी लावल्याने आता ग्रामीण भागात शेतीच्या कामांनाही वेग येणार आहे. सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली. अचानक जोरदार आलेल्या पावसामुळे वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली. ढगाळ वातावरण असल्यामुळे दिवसादेखील वाहनचालकांना गाडीचे हेडलाईट सुरू ठेवून गाडी चालवण्याची वेळ आली.
Monsoon Prediction | कोकणसह मुंबई, ठाण्यात 3 ते 5 जूनदरम्यान पावसाचा अंदाज
मान्सूनपूर्व मुसळधार पावसाने बेळगावलाही एका तासाहून अधिक काळ झोडपून काढलं. गेल्या दोन दिवसांपासून बेळगाव आणि परिसरात तापमानात कमालीची वाढ झाली होती. पावसाच्या सरी कोसळणार असं वाटत होतं, पण दोन दिवस पावसाने हुलकावणी दिली होती. अखेर रविवारी दुपारी आकाश अंधारून आलं आणि काही वेळाने पावसाला सुरुवात झाली. एक तास मुसळधार पावसामुळे बेळगावकर सुखावले आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची आणि रस्त्यावरील विक्रेत्यांची मात्र तारांबळ उडाली. पावसामुळे बेळगावकरांना सुखद गारवा अनुभवायला मिळाला आहे हे नक्की.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून बळीराजा मोठं नुकसान पेलतोय, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतमाल बाजारात न गेल्याने किंवा त्याची विक्रीच न झाल्याने शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय. केंद्र सरकारने काल, शनिवारी केलेल्या घोषणेनुसार बिगर कंटेन्मेंट झोनसाठी हा लॉकडाऊन अनलॉक 1.0 असा असेल, म्हणजेच यात हळूहळू काही क्षेत्रांना परवानगी दिली जाईल. त्यामुळे बाजारात पूर्वीपेक्षा जास्त शेतमाल विकला जाईल अशी अपेक्षा आहे. सोबतच पुन्हा आशा घेऊन उभं राहण्यासाठी पावसाळाच आता शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकतोय.