मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची तयारी दाखवली आहे. मात्र आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलू नका, अशी भूमिका बहुतांश मंत्र्यांनी महाराष्ट्र प्रभारी यांच्यासमोर मांडली आहे. राज्यात घडी बसली आहे. सरकार स्थापनेनंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले आहे, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील समोर आहेत. अशा वेळी बाळासाहेब थोरात यांना बदलण्याचे औचित्य किंवा कारण दिसत नाही, अशी भूमिका अनेक मंत्र्यांनी काँग्रेस प्रभारी एच के पाटील यांच्या समोर मांडली.
दोन दिवस एच के पाटील हे मुंबईत येऊन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी कोण असावे याची चाचपणी करत आहेत. सकाळपासून त्यांनी काँग्रेसच्या मंत्र्यांबरोबर वैयक्तिक संवाद साधला. दुपारनंतर प्रभारी काँग्रेस आमदारांशी बोलणार आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांनी काँग्रेसच्या तीन बड्या नेत्यांचा कल जाणून घेतला.
महाराष्ट्रात सध्या काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाचे वारे वाहत आहेत..त्या पर्शवभूमीवर राज्याचे प्रभारी एच के पाटील यांनी काल पासून भेटीना सुरुवात केली. काल रात्री एच के पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्याबरोबर चर्चा केली. सगळ्याच नेत्यांबरोबर एचके पाटील यांनी वैयक्तिक चर्चा केली. त्यावेळी बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याची तयारी दाखवली. वारंवार आपल्याकडे अधिक पद आहे ही पद दुसऱ्या कुणाला द्यावी पक्षात सतत हा सूर असल्याने प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याच्या मानसिकतेत आपण असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी प्रभारी यांच्यापुढे स्पष्ट केले
पण असं असलं तरी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली त्या दारुण पराभवानंतर बाळासाहेब थोरात याना राज्यात जबाबदारी मिळाली. अवघ्या दोन महिन्यात त्यांनी पक्ष बांधला आणि 2014 ला काँग्रेसला 42 जागा मिळाल्या होत्या. त्या 2019 मध्ये 44 जागा जिंकून आणल्या. पक्षातील अनेक दिगग्ज सोडून गेल्यावरही बाळासाहेबांनी काँग्रेसच्या जागा निवडून आणल्या. इतकंच नाही तर राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस सहभागी व्हावे यात त्यांनी प्रमुख भूमिका बजावली.
महाराष्ट्रासारख्या राज्यात काँग्रेस सत्तेत आली. पक्ष आणि सरकार ह्यात मोठा दुवा बाळासाहेब थोरात आहेत. प्रदेशाध्यक्ष, विधी मंडळ नेते तेच असल्यामुळे समन्वय योग्य होतो. नवीन प्रदेशाध्यक्ष आल्यास सरकार बाहेर बसून सतत टीका टिपण्णी केली तर त्याचा सरकारच्या स्थैर्यतेवर परिणाम होईल. आघाडी सरकार चालवताना शांत डोक्याने काम केलं पाहिजे. जास्त आक्रमक भूमिका घेतल्यास परिणाम सरकार वर होऊ शकतो. सरकार आल्यानंतर विधान परिषद निवडणुकीत यश मिळाले आहे. असं असल्यामुळे बाळासाहेब थोरात यांना बदलण्यात काही औचित्य किंवा कारण नसल्याचे काँग्रेस मंत्र्यांनी प्रभारी एच के पाटील यांच्यापुढे आपली भूमिका मांडली.
आज सकाळपासून एच के पाटील यांनी मंत्री आणि कार्यकारी अध्यक्ष यांची मत जाणून घेतली. संध्याकाळ नंतर आमदारांची मत ते जाणून घेत आहेत. एकूणच महाविकास आघाडीच्या या स्थैर्यासाठी बाळासाहेब थोरात पदावर राहिले पाहिजे ही भूमिका बहुतांश मंत्र्यांनी मांडली. यानंतर आता दिल्लीत हायकमांड काय निर्णय घेणार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक येत आहेत त्याला नवीन प्रदेशाध्यक्ष काँग्रेसला मिळणार का ही प्रश्न तूर्तास अनुत्तरित आहे.
प्रदेशाध्यक्षपद बिगर मराठा नेतृत्वावर केंद्रीत होण्याची शक्यता
महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी या पदाची जबाबदारी सोडण्याची तयारी दर्शवली आणि त्यानंतर राज्यात महाराष्ट्र काँग्रेसला नवीन नेतृत्वासाठी प्रक्रिया सुरू केली. थोरात यांच्यानंतर बिगर मराठा चेहरा द्यावा अशी चर्चा काँग्रेस वर्तुळात सुरू झाली. त्यामुळे काँग्रेसमध्ये मराठवाड्यातून राजीव सातव, विदर्भातील विजय वडेट्टीवार, नितीन राऊत आणि नाना पटोले यांच्या नावाची चर्चा सुरू झाली.
राजीव सातव ओबीसी असून राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचे विश्वासू आहेत. राजीव सातव यांनी अखिल भारतीय युवक काँग्रेसची जबाबदारी अनेक वर्षे पार पाडली होती. सध्या त्यांच्याकडे गुजरात राज्याची जबाबदारी देण्यात आली आहे..राजीव सातव यांना पक्षात विरोधक म्हणून अशोक चव्हाण यांना बघितलं जात. त्यांच्या विवादामुळे 2019 मध्ये राजीव सातव यांनी लोकसभा निवडणूक देखील लढली नाही.
त्यानंतर चंद्रपूरचे विजय वडेट्टीवार हे इच्छूक आहेत. विजय वडेट्टीवर हे 15 वर्षांपूर्वी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आले. ते तेली समाजाचे आहेत. काँग्रेसचा आक्रमक चेहरा आहेत. त्याच्याकडे मदत आणि पुनर्वसन तसेच बहुजन कल्याण मंत्रालयाची सध्या जबाबदारी आहे.
नितीन राऊत काँग्रेसचा मागासवर्गीय चेहरा. अखिल भारतीय काँग्रेसच्या मागासवर्गीय विभागाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याकडे ऊर्जा खात्याची जबाबदारी असून ते नागपूरचे आहेत
नाना पटोले हे भंडारा गोंदीयातील नेते. विदर्भातील ओबीसी चेहरा, आक्रमक नेते. अखिल भारतीय काँग्रेस किसान सेलच्या अध्यक्षपदी होते. 2014 लोकसभा निवडणुकीला काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले. पण शेतकऱ्यांच्या विषयावर खासदारकीची राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये परतले. 2019 लोकसभा नितीन गडकरी विरोधात लढली. त्यामुळे जर बिगर मराठा चेहरा द्यायचा असेल तर ही नाव चर्चेत आहेत..
पण ह्यातील विजय वडेट्टीवर आणि नितीन राऊत यांना प्रदेशाध्यक्ष जबाबदारी मिळाल्यास मंत्रिपद सोडावं लागेल. तसेच नाना पटोले हे सध्या विधानसभा अध्यक्ष आहेत. त्यामुळे ते जर प्रदेशाध्यक्ष झाले तर त्यांना अध्यक्षपद सोडावे लागेल.
संबंधित बातम्या
- EXCLUSIVE | एच के पाटील यांची थोरात आणि चव्हाणांशी चर्चा, काँग्रेसच्या बैठकीत काय काय झालं?
- अद्याप मी राजीनामा दिलेला नाही : बाळासाहेब थोरात