कोल्हापूर : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने सध्या राज्यभरात गावागावात राजकीय रणधुमाळी सुरु आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 433 ग्रामपंचायतींचा धुरळा उडणार आहे. यापैकी 47 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. मात्र या सगळ्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या गावाची ग्रामपंचायत जास्त चर्चेत आहे.


उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी (4 जानेवारी) संपल्याने प्रत्येक गावातील चित्र स्पष्ट झाले आहे. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असे राजकीय चित्र आहे. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या या गावात मात्र भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष शिवसेनेच्या विरोधात एकत्र आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील खानापूर या गावातील युतीची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरु आहे. शिवसेनेचे आमदार प्रकाश अबिटकर यांना रोखण्यासाठी रणनीती सुरु झाली आहे.


साम दाम दंड भेद या सर्व नीतीचा प्रचारात जोरदार वापर सुरु झाल्याने गावागावातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गावागावात पक्षापेक्षा गटातटाच्या राजकारणाला अधिक महत्त्व असते. यामुळे विधानसभा आणि लोकसभेला अडचण नको म्हणून आमदार, खासदार या निवडणुकीत फारसे लक्ष घालत नाहीत. यामुळे गावागावात सोयीच्या आघाड्या करुन निवडणुका होतात.


शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख असलेले प्रवीण सावंत भाजपमध्ये गेले. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते भाजपवासी झाले. यातून गावात राजकीय चुरस निर्माण झाली. शिवसेनेला रोखण्यासाठी मग भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेतली. यामुळे या गावात भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली. आता त्यांच्याविरोधात शिवसेना लढणार आहे.


ग्रामपंचायत निवडणुकीच्या राजकारणात आमदार खासदार लक्ष घालत नाहीत. स्थानिक पातळीवरील आघाडी या संदर्भातले निर्णय घेत असते. त्यामुळे आमदार किंवा खासदार हे फक्त आपल्या दुसऱ्या फळीतील नेत्याकडे याची जबाबदारी सोपवत असतात. या ठिकाणीदेखील अशाच पद्धतीचे चित्र पहायला मिळत आहे. भाजप काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीचे नेतृत्व प्रवीण सावंत, भुजंगराव पाटील, सुनील मांगले आदी मंडळी करत आहेत तर शिवसेनेकडून बी.डी भोपळे आणि राजू पाटील आदी मंडळी करत आहेत.