मुंबई : पक्षांतर्गत राजकारणामुळे बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. काल बाळासाहेब थोरात यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटीही घेतल्याची माहिती मिळत आहे. मात्र मी अद्याप राजीनामा दिलेला नाही, पण जर तरुणांना संधी मिळणार असेल तर मी त्यांच्या पाठीशी उभा राहिन, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिल्लीवारीनंतर एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना दिली आहे.
अद्याप राजीनामा दिलेला नाही : बाळासाहेब थोरात
"मी राजीनामा देण्यासाठी दिल्लीला गेलो नव्हतो, दर महिन्याचे काही विषय असतात त्यावर चर्चा करण्यासाठी मी दिल्लीला गेलो होतो. परंतु, ही बातमी मलाही दिल्लीला समजली. ज्यावेळी निवडणूक झाली, मंत्रिमंडळाचं गठन झालं. त्यावेळीच मी दिल्लीमध्ये जाऊन सांगितलं होतं की, मी प्रदेशाध्यक्ष आहे, महसुल मंत्री आहे, विधिमंडळ काँग्रेसचा नेताही आहे. माझ्याकडे यासर्व जबाबदाऱ्या आहेत. मी उत्तमरित्या सांभाळीन, परंतु, तुम्हाला कधी वाटलं की, यापैकी काही जबाबदाऱ्या इतर कोणाकडे सोपवायच्या आहेत, तर माझी त्याला हरकत नाही." पुढे बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, "ऑक्टोबर महिन्यातही काही चर्चा सुरु झाल्या त्यावेळी मी स्वतःहून सांगितलं होतं की, तुम्हाला जर जबाबदाऱ्यांचं विभाजन करायचं असेल तर माझी हरकत नाही. कारण माझ्या एकट्या कडेच सर्व जबाबदाऱ्या आहेत. त्या मी समर्थपणे सांभाळतोय, पण जरी काही वाटलं तर जबाबदाऱ्यांचं विभाजन करण्यास माझी हरकत नाही."
पाहा व्हिडीओ : मी अजून अध्यक्ष आहे, अद्याप राजीनामा दिलेला नाही : बाळासाहेब थोरात
बाळासाहेब थोरात म्हणाले की, "एच. के. पाटील प्रभारी झाल्यानंतरही मी त्यांनाही ही वस्तुस्थिती सांगितलं होती. पण काल अचानक माझ्या राजीनाम्याच्या बातमी का प्रसारित झाल्या मला माहिती नाही. पण जर तशी प्रोसेस सुरु झाली असेल तर मी तिची स्वागतच करतो.' पुढे बोलताना ते म्हणाले की, "काल दिल्लीत राजीनाम्याबाबत माझी चर्चाही झालेली नाही. चर्चाही करण्याची गरज नव्हती. कारण मी याआधीच ते स्पष्टपणे सांगितलं होतं." तसेच त्यांना सांगितलं की, "जर जबाबदाऱ्यांच्या वाटपाचा निर्णय घेताना तरुण धडाडीचा आणि जो काँग्रेस पक्षाला पुढे घेऊन जाईल, अशा व्यक्तीलाच नेतृत्त्वाची संधी द्यावी."
दरम्यान, काँग्रेसमध्ये मुंबईचा अध्यक्ष बदलल्यानंतर आता महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा सुरु होती. एकीकडे महाराष्ट्रात काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलला जाणार का अशी चर्चा सुरु झाली. तर दुसरीकडे बाळासाहेब थोरात हे स्वत:च हे पद सोडण्याच्या मानसिकतेत आहेत. काल दिल्लीत येऊन त्यांनी काँग्रेसचे संघटन महासचिव के सी वेणुगोपाल, खजिनदार पवन बन्सल यांच्या गाठीभेटी घेतल्या. परंतु, बाळासाहेब थोरातांनी मी अजून प्रदेशाध्यक्ष आहे, राजीनामा दिलेला नाही, असं सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
बाळासाहेब थोरात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद सोडण्याच्या तयारीत, राजीनाम्याच्या अवस्थेत का आले थोरात?