औरंगाबाद : आपली चूक नसताना आपल्या बँक खात्यातून रक्कम काढून फसवणूक केली गेली तर अशा परिस्थितीत त्याला बँक व्यवस्थापन जबाबदार असेल. यासंदर्भात राष्ट्रीय ग्राहक तंटा निवारण आयोगाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. एका अनिवासी भारतीय महिलेच्या झालेल्या फसवणूक प्रकरणात बँक व्यवस्थापनाला जबाबदार धरले आहे.


चूक नसताना आपल्या खात्यातून रक्कम गायब झाली तर घाबरू नका कारण आता त्याला सर्वस्वी बँक जबाबदार असणार आहे. इलेक्ट्रॉनिक बँकींग यंत्रणेतल्या त्रुटी शोधत अनेकजण आपल्या बँकेतल्या रकमेवर डल्ला मारतात. पण याला ग्राहकांचा हलगर्जीपणा म्हणून बँक पैसे द्यायला टाळाटाळ करतात. अशाच एका केसमध्ये राष्ट्रीय ग्राहक तंटा निवारण आयोगाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.


एखादी बँक खातेदाराचे खाते उघडत असेल तर त्या व्यक्तीला पैसे संरक्षण करण्याची जबाबदारी बँकेची आहे. कोणत्याही प्रणालीत बिघाड झाला मग तो बँकेकडून किंवा अन्य प्रकारे असेल त्यासाठी ग्राहक नाही ही तर बँक व्यवस्थापन जबाबदार असेल, असंही न्यायालयाने म्हटलं आहे.


लॉस एंजलिसमध्ये राहणारी मुलगी जेसिना हिने जॉबसाठी ठाण्यातील एचडीएफसी बँकेकडून एक प्री-पेड फॉरेक्स प्लस डेबिट कार्ड 2007 मध्ये घेतले होते. 19 डिसेंबर 2008 रोजी बँकेने जेसिकाच्या वडिलांकडून 310 डॉलर्सची रक्कम काढल्याबद्दल हमी तर मागितली. वडिलांनी बँकेला असे कोणतेही व्यवहार केले नसल्याचे उत्तर दिले. दुसऱ्याच दिवशी बँकेने 14 ते 20 डिसेंबरदरम्यान 6 हजार डॉलर्सची रक्कम काढली असल्याचे सांगितले. पण ग्राहकाकडून कुठलाही हलगर्जी झाली नव्हती ना असे व्यवहार झाले होते.


एचडीएफसी बँकेने दाखल केलेली याचिका फेटाळून लावत आयोगाने पीडित महिलेला 6110 डॉलरची म्हणजेच अंदाजे चार लाख 46 लाख रुपये रक्कम 12 टक्के व्याजासह परत करण्याचे आदेश दिले आहेत. मानसिक छळ केल्याप्रकरणी पीडितेला नुकसान भरपाई म्हणून चाळीस हजार रुपये आणि याचिकेची खर्चाचे पाच हजार रुपये देण्याचे आदेश देखील बँक व्यवस्थापनाला दिले आहेत.