शिर्डी : दिवाळीतील पाडव्याच्या मुहूर्तावर ठाकरे सरकारने राज्यातील सर्व धार्मिक स्थळं सुरु करण्यास परवानगी दिली. त्यानंतर शिर्डीतील साई मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं. 16 नोव्‍हेंबर ते 24 नोव्‍हेंबर या कालावधीत सुमारे 48 हजार 224 साईभक्‍तांनी साईबाबांच्या समाधीच्‍या दर्शनाचा लाभ घेतला आहे. तर या काळात साईभक्‍तांकडून विविध प्रकारे 3 कोटी 9 लाख 83 हजार 148 रुपये देणगी संस्‍थानला प्राप्‍त झालेली आहे.


कोरोनाच्‍या संकटामुळे प्रतिबंधात्‍मक उपाययोजना म्‍हणून शासनाच्‍या वतीने लॉकडाऊननंतर 17 मार्च पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी बंद ठेवण्‍यात आलेले होते. राज्‍य शासनाच्या घोषणेनंतर पाडव्‍याच्‍या मुहुर्तावर साई मंदिरात दर्शनासाठी खुले करण्‍यात आले. 24 नोव्हेंबरपर्यंत सुमारे 48 हजार 224 साईभक्‍तांनी साईदर्शनाचा लाभ घेतला. यामध्‍ये टाइम बेस, जनसंपर्क कार्यालय व ऑनलाईन या सेवांचा सामावेश असून ऑनलाईन व सशुल्‍क दर्शन, आरती पासद्वारे 61 लाख 4 हजार 600 रुपये प्राप्‍त झालेले आहे. तसेच या कालावधीमध्‍ये साईप्रसादालयामध्‍ये सुमारे 80 हजार साईभक्‍तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला.


16 नोव्‍हेंबर ते 24 नोव्‍हेंबर या कालावधीत रोख स्‍वरुपात एकूण 3 कोटी 9 लाख 83 हजार 148 रुपये इतकी देणगी प्राप्‍त झालेली आहे. यामध्‍ये दक्षिणापेटी मोजणी रुपये 1 कोटी 52 लाख 57 हजार 102, देणगी काऊंटर 33 लाख 6 हजार 632 रुपये, डेबीट क्रेडीट कार्ड, ऑनलाईन, चेक डी.डी.देणगी, मनी ऑर्डर रुपये 1 कोटी 22 लाख 50 हजार 822 रुपये आणि सहा देशांचे परकीय चलन अंदाजे रुपये 1 लाख 68 हजार 592 यांचा समावेश आहे. तर 64.500 ग्रॅम सोने व 3801.300 ग्रॅम चांदी संस्‍थानला देणगी स्‍वरुपात प्राप्‍त झालेली आहे.