जळगाव : चोरीसाठी अल्पवयीन मुलांसह अन्य साथीदारांना मार्गदर्शन करुन प्रत्यक्ष स्वत: सहभागी न होता सोन्याच्या दुकानात चोरी करणाऱ्या टी सी  पुत्रासह दोन आरोपींना अटक करण्यात जळगाव पोलिसांना यश मिळाले आहे.


इंटरनेट च्या जमान्यात आपल्या ज्ञानाचा कोण कसा वापर करेल हे सांगता येत नाही. आपल्या चौकस बुद्धीचा वापर करीत भुसावळ शहरातील सोनू म्हस्के या तरुणाने आपल्या हुशारीचा वापर करत दोन अल्पवयीन मुलांसह अन्य काही तरुणांना सोन्याच्या दुकानात चोरी कशी करता येईल याच मार्गदर्शन केले. सोनूने तयार केलेल्या प्लॅननुसार एक अल्पवयीन आणि सराईत गुन्हेगार असलेले दोन तरुणांनी मागील आठवड्यात वरण गाव येथील मुख्य बाजारपेठेत असलेल्या सोन्याच्या दुकानात चोरी करत दागिन्यांसह पावणे तीन लाखांचा ऐवज लंपास केला होता. या घटनेचा पोलीस तपास सुरू असताना अन्य चोरीच्या तपासात स्थानिक गुन्हे शाखा पोलीस एका चोरट्यांपर्यंत जाऊन पोहोचले होते. या चोरट्याने पोलिसांना आपण केलेल्या चोरी सोबतच परिसरात असलेल्या एका अल्पवयीन चोराची माहिती दिली होती. या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर पोलिसांना नवीनच माहिती मिळाली होती.


पोलिसांनी दिलेल्या या माहिती नुसार भुसावळ शहरात रेल्वे कॉलनीत राहणारा सोनू म्हस्के हा रेल्वे तिकीट निरीक्षकाचा मुलगा चोरीच्या कटात सहभागी असल्याचे समोर आले होते. एफवाय सायन्स शिकत असलेला सोनू हा बुद्धीने हुशार आणि चौकस आहे. त्याने आपल्या हुशारीचा वापर करीत चोरीच्या गुन्ह्यात स्वतः सहभागी न होता अन्य सहकाऱ्यांना मार्गदर्शन करीत चोरीचा डाव आखला होता. त्यासाठी त्याने स्वतः रेकी करून वरणगाव येथे सोन्याच दुकान हेरलं होतं. या दुकानात रात्री कशी चोरी करता येऊ शकेल याचा त्याने पूर्णपणे अभ्यास करून आपल्या सहकाऱ्यांना त्या विषयी मार्गदर्शन केले होते. सोनूच्या सांगण्यावरुन एक अल्पवयीन आणि एक सराईत गुन्हेगार असलेल्या तरुणाने सोन्याचे दुकान फोडून पावणे तीन लाख रुपयांचे दागिने लंपास करण्यात यश मिळविले होते. सोनूच्या साथीदारांनी त्याच्या मार्गदर्शनाखाली चोरीत यश मिळविले असल्याने चोरीत प्रत्यक्ष सहभाग घेतला नसला तरी चोरीतील तिसरा हिस्सा सोनूला मिळाला होता.


सोनूच्या हुशारीमुळे पोलिसांना सोन्याच्या दुकानात चोरी करणारे चोर शोधण्यात अपयश आले होते. अन्य चोरीच्या गुन्ह्यातील चोरट्याने दिलेल्या माहितीमुळे सोनू म्हस्के आणि त्याच्या गॅंगचा तपास लावण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. यातील सोनू आणि त्याचा अल्पवयीन साथीदाराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. मात्र या गुन्ह्यातील एक सराईत गुन्हेगार मात्र अद्याप ही पोलिसांच्या हाती लागलेले नाही. या दोघांच्या घरी पोलिसांनी केलेल्या तपासणीत चोरीच्या दागिन्यांसह काही शस्त्र पोलिसांनी जप्त केले आहेत.


या चोरीच्या घटनेत सोनू हा चोरी करण्यासाठी अल्पवयीन मुलांना मार्गदर्शन करून चोरीसाठी वापर करीत असल्याच उघड झाले आहे. आता पर्यंत त्याने तीन जणांना अशा प्रकारे गुन्हेगारीकडे वळविल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. चांगल्या घरातील आणि शिक्षणात हुशार असलेल्या सोनू म्हस्केचे गुन्हेगारी क्षेत्राकडे वळण हे समाजासाठी मोठा चिंतेचा विषय आहे.सोनू आणि त्याच्या साथीदारांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना कारागृहात रवाना केले आहे.