परभणी : ग्रामीण भागातील गुणवत्तेला तोड नाही हे अनेक वेळा सिद्ध झालंय. परभणीच्या जिंतूरमधील बोर्डी गावातील सालगडी आई वडिलांची मुलगी वैष्णवी कदमने स्वतःच्या मेहनतीने नीट परीक्षेत 596 गुण मिळवून डॉक्टर होण्याच्या स्वप्नाकडे पहिलं पाऊस टाकलं आहे. मात्र तिच्या पुढच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनलाय. वडील मणक्याच्या आजाराने ग्रासलेले, आई इतरांच्या शेतात काम करून प्रपंच चालवते. घरी अठरा विश्व दारिद्य्र अशा परिस्थितीत पुढील शिक्षण कसे करायचे हा प्रश्न तिच्या समोर पडलाय. वैष्णवीला शिक्षणासाठी आर्थिक पाठबळाची गरज आहे.


परभणीच्या जिंतुर तालुक्यातील बोर्डी हे जेमतेम 1200 लोकवस्तीचं गाव. याच गावात अतिशय गरीब परिस्थितीत जन्मलेल्या वैष्णवी कदम हिने आपल्या जिद्द आणि मेहनतीने नीट परीक्षेत 596 गुण घेत यश संपादन केलंय. वडिलांकडे केवळ अर्धा एकर शेती असल्याने ते गावातील इतर शेतकऱ्याकडे सालगडी म्हणून काम करून प्रपंच चालवत. मात्र त्यांचे मणक्याचे ऑपरेशन झाले अन् ते घरीच बसले. प्रपंच चालवण्यासाठी आता आई शेतात मजुरी करतेय. एकूणच घरातील हालाखीची परिस्थिती मात्र वैष्णवीची जिद्द होती की कुठल्याही परिस्थितीत डॉक्टर व्हायचे तिने आणि तिच्या मावशी आणि काकाच्या मदतीने परभणीत शिक्षण घेत नीटमध्ये तब्बल 596 गुण मिळवत डॉक्टर होण्याच्या स्वप्नाकडे पहिलं पाऊल टाकलं. आता तिला पुढील शिक्षणाची चिंता सतावतेय.


वैष्णवीचे वडील केशव कदम यांना वैष्णवी आणि अनिकेत कदम ही दोन मुलं. गावातील एका कोपऱ्यात दोन रूमच्या घरात कदम परिवार राहतं. केशव कदम यांना अर्धा एकर शेती त्यामुळे दोन वर्षपूर्वी पर्यंत ते इतर शेतकऱ्यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करत. मात्र त्यांना मणक्याचा आजार झाला एक ऑपरेशन झाले त्यामुळे त्यांना आता काम करता येत नाही. पतीची झालेली अवस्था मुलांच्या शिकवण्याची जिद्द असल्याने वैष्णवीची आई चौथरा बाई या रोज घरकाम करून शेतात मजुरीसाठी जातात. मागील दोन वर्षांपासून त्याच घर चालवतात. आपल्याला शिक्षण झेपत नसले तरी त्यांनी त्यांच्या बहीण आणि भाऊजींना सांगून वैष्णवीला त्यांच्याकडे ठेवलं, तिला शिकवलं. मात्र पुढील शिक्षणासाठी मोठा खर्च लागणार असल्याने त्याही तिच्या भविष्यासाठी चिंताग्रस्त आहेत.


वैष्णवीने नीट परीक्षेत यश प्राप्त केल्यानंतर तिचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे प्रवेश झाला. तिथे जाण्यासाठी व फीस भरण्यासाठीही तिच्याकडे पैसे नव्हते. गावातील राजेंद्र कदम यांनी वैष्णवीला मदत करण्याचे ठरवले आणि गावकऱ्यांच्या ही बाब लक्षात आणून दिली. तेव्हा गावकऱ्यांनी तिला मदत करून तिच्या जाण्या येण्याचा आणि फीमधील काही रक्कम जमा करून तिची प्रवेश प्रक्रिया पार पाडली. मात्र प्रत्येक वेळी गावकरी आर्थिक मदतीसाठी पुढे येऊ शकत नसल्याने इतरांनीही वैष्णवीसाठी पुढे यावं असं आवाहन गावकरी करत आहेत.


दरम्यान आपण पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अंगी जिद्द आणि चिकाटी ठेवली तर वाट्याला कितीही संघर्ष आला तरी त्यातून मार्ग काढून यश मिळते हे वैष्णवीने सिद्ध करून दाखवले आहे. त्यामुळे तिला पुढील शिक्षणासाठी मदत मिळाली तर ती नक्कीच एक नामवंत डॉक्टर होऊन जनसामान्यांच्या सेवेत राहील हे तितकेच खरे.