बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील आदिवासी बहूल असलेल्या संग्रामपुरमध्ये हॉस्पिटलला टाळं असल्यानं एका आदिवासी महिलेची गटाराशेजारी प्रसुती झाली आहे. वरवट बकाला ग्रामीण रुग्णालयामध्ये हा प्रकार घडला आहे. गेल्या अनेक दिवसापासून या रुग्णालयात एकही डॉक्टर नसल्याने स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं.


3 जूनला या रुग्णालयातील डॉक्टरांच्या खुर्चीला चपलांचा हार घातला आणि डॉक्टरांच्या केबिनला कुलुप ठोकलं. मात्र कुलुप ठोकल्यामुळे रुग्णालयातील नर्स व कर्मचाऱ्यांनी संपूर्ण दिवस सूट्टी असल्यासारखा घालवला आणि रुग्णालयातून गायब झाले. त्यामुळे एका आदिवासी महिलेला रुग्णालयाबाहेर गटारात बाळाला जन्म द्यावा लागल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे

रुग्णालयाच्या ढिसाळ कामाबाबत तसंच डॉक्टर उपलब्ध नसल्यानं काँग्रेसनं आंदोलन केलं आणि डॉक्टरच्या केबिनला कुलुप ठोकलं. मात्र यानंतर कर्मचारी रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारालाच कुलुप ठोकून घरी पसार झाले. सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास तूनकी येथील संगत गजरती या आदिवासी महिलेला यामुळे नाहक त्रास सहन करावा लागला.

प्रसूती जवळ आलेल्या या महिलेला रुग्णालयात आणल्यानंतर तिच्या पतीला कुलुप दिसलं. त्यामुळे कर्मचाऱ्य़ांना शोधण्यासाठी पत्नीला सोडून पती आजूबाजूला फिरत होता. मात्र याचवेळी ती महिला रुग्णालयासमोरच्या गटारीत प्रसूत झाली. रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्यानं रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे.