मुंबई : औषध विक्री करणारे सेल्समन आणि डॉक्टर यांच्या संबंधांवर, संभाषणांवर आधारीत पुण्याच्या साथी (support for advocacy and training to health initiative) या संस्थेने एक अहवाल सादर आहे. या अहवालाद्वारे अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. डॉक्टर औषधांची विक्री करणाऱ्या सेल्समनकडे कोणकोणत्या मागण्या करतात? डॉक्टर आणि औषध कंपन्यांच्या काळ्या धंद्याचे रुग्णांवर किती गंभीर परिणाम होत आहेत? या बाबींवर 'साथी'ने प्रकाश टाकला आहे.


मुंबई, पुणे, नाशिक या महाराष्ट्रातल्या तीन शहरांसह देशातल्या लखनौ, कोलकाता, हैदराबाद अशा एकूण सहा शहरांमध्ये साथीने सर्वेक्षण केले. अनेक मुलाखती घेतल्या. त्यानंतर सादर केलेल्या अहवालात वैद्यकीय व्यवसायाच्या काळ्या बाजू समोर आल्या आहेत.

मी तुमची औषधं विकतो, तुम्हाला जास्तीत जास्त बिझनेस मिळवून देतो त्याबदल्यात तुम्ही मला जास्तीत जास्त कमिशन द्या, परदेश वारीचं पॅकेज द्या, अशा मागण्या डॉक्टर सेल्समनकडे करतात. काही डॉक्टर याच्याही पुढे जाऊन कमिशनऐवजी मुली किंवा महिला पुरवा, अशी मागणी करतात.

डॉक्टर आणि औषधविक्री करणाऱ्या कंपन्यांमधील या बनेल नात्यामुळे दरवर्षी तीस हजार कोटीहून अधिक रकमेची अनावश्यक औषधे रुग्णांना खरेदी करावी लागत आहेत. अशा गरज नसलेल्या औषधांचे रुग्णांच्या शरीरावर गंभीर परिणाम होत आहेत. यापैकी कोणतीही मागणी न करणारे, तसेच बनावट औषधांची विक्री न करणारे काही डॉक्टर समाजात कार्यरत असल्याची बाबदेखील 'साथी'ने सर्वेक्षणात नमूद केली आहे.

डॉक्टर अरुण गद्रे, डॉक्टर अर्चना दिवटे या दोन डॉक्टरांनी मुंबई-पुणे-नाशिकसह देशातल्या सहा शहरात अभ्यास केला. त्यासाठी फेडरेशन ऑफ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन ऑफ इंडियाच्या (FMRAI) वैद्यकीय प्रतिनिधींची मदत घेतली.

या अहवालत एक इंग्रजी भाषेत नोंद करण्यात आली आहे, some doctors who give huge business demand women for entertainment and these demands are met. याचा मराठी अर्थ औषध कंपन्यांना मोठा बिझनेस देणाऱ्या कांही डाँक्टरांनी औषध कंपन्यांकडे निलाजरेणाने मनोरंजनासाठी महिलांची मागणी केली.

औषध कंपन्या डॉक्टरांना औषधांच्या औषधी गुणांची माहिती न देता औषध विक्रीतून व्यवसाय कसा वाढवावा हेच सांगतात. काही डाँक्टरांनी स्वतःच्या औषध कंपन्या स्थापन केल्या आहेत. तर काही डॉक्टर त्यांना हवी तशी औषधं कंपन्यांकडून बनवून घेत आहेत.

औषध कंपन्यांसाठी डॉक्टरांचं शिक्षण महत्त्वाचं नाही. डॉक्टर किती व्यवसाय देतात हे जास्त महत्त्वाचं झालं आहे. जास्तीत जास्त बिझनेस मिळावा यासाठी औषध कंपन्या डॉक्टरांच्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सवर पैसे खर्च करतात. डॉक्टरांना डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, पेट्रो कार्ड, ई व्हाउचर्स, अॅमेझॉन-फ्लिपकार्टवरील शॉपिंगसाठी कुपन्स देतात. नियमावलींचे उल्लंघन करण्यासाठी अनेक औषध कंपन्यांनी बोर्डावर असलेल्या पदाधिकारी डॉक्टरांना सोन्याचे दागिने भेट म्हणून दिले असल्याचा धक्कादायक दावादेखील सर्वेक्षणात करण्यात आला आहे.

दरम्यान, साथीचा अहवाल आल्यानंतर एबीपी माझाच्या टीमने या अहवालाची पडताळणी करुन पाहिली. माझाच्या टीमनेदेखील काही डॉक्टरांच्या मुलाखती घेऊन अहवालाची फेरतपासणी केली. त्यात बरीच माहिती खरी असल्याचे समोर आले आहे.

उद्योगपती अझीम प्रेमजी यांच्या ट्रस्टकडून साथीच्या यासंशोधनासाठी आर्थिक मदत केली आहे. डॉक्टरांच्या अशा बेताल वागण्यामुळे रुग्णांना अधिक किंमतीची, अनावश्यक औषधं विकली जातात. आवश्यकता नसतानादेखील रुंग्णांवर अॅन्टिबायोटिक्सचा मारा केला जात आहे. सुमारे 29 हजार कोटी रुपयांची अनावश्यक औषधं ग्राहकांच्या माथी मारली जात आहेत.