सोलापूर : महानगरपालिकेच्या निवणूकीच भाजप विजयी झाला असून महापौर आणि उपमहापौरपदी भाजपचेच नगरसेवक विराजमान झाले आहेत. सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या श्रीकांचना यन्नम यांची निवड असून त्यांना 51 मतं पडली आहेत, तर एमआयएमच्या शेख यांना 8 मतं पडली आहेत. या निवडणूकीत काँग्रेस, शिवसेना, बसपा, माकप यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. तर बसपा आणि शिवसेनेच्या प्रत्येकी एक नगरसेवकाने भाजपला पाठिंबा दिला होता. तसेच या निवडणूकीत महाविकासआघाडीला संख्याबळ जमवण्यात अपयश आलं आहे.


पाहा व्हिडीओ : भाजपच्या श्रीकांचना यन्नम यांची सोलापूरच्या महापौरपदी वर्णी



सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज (बुधवारी) निवडणूक घेण्यात आली. महापौरपदासाठी चार सदस्यांनी अर्ज दाखल केले होते. भाजपकडून श्रीकांचना यन्नम तर महाविकासआघाडीने शिवसेनेच्या सारिका पिसे यांची उमेदवारी निश्चित केली होती. तर एमआयएमने शाहजिदाबानो शेख आणि काँग्रेसने फिरदोस पटेल यांना उमेदवारी दिली होती. सोलापूर महानगरपालिकेत एकूण 102 सदस्य आहेत. त्यातील 49 सदस्य भाजपचे आहेत. त्यानंतर शिवसेना २१, काँग्रेस 14, एमआयएम 9, राष्ट्रवादी 4 वंचित बहुजन आघाडी 3, बसपा 1, माकप 1 असे पक्षांचे बलाबल आहे.

उपमहापौर पदासाठी एकूण 9 उमेदवारांचे 13 अर्ज दाखल करण्यात आले होते. या पदासाठी भाजप आणि महाशिवाआघाडीत थेट लढत होती. भाजपकडून राजेश काळे तर महाशिवआघाडीकडून काँग्रेसच्या फिरदोस पटेल यांच्यामध्ये थेट लढत होती. यामध्ये भाजपचे राजेश काळे यांचा विजय झाला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर महानगरपालिकेत महाविकासआघाडीचाच महापौर विराजमान होईल असा दावा केला होता. मात्र निवडणूकीत भाजपाने बाजी मारल्याने महाविकासआघाडीचा प्रयोग फसल्याचं चित्र दिसत आहे.