रायगड: चार दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या 7 वर्षीय चिमुकलीचा मृतदेहच आढळल्याने खळबळ उडाली आहे. दिया जाईलकर असं या चिमुकलीचं नाव आहे.


ती घरगुती साहित्य आणण्यासाठी दुकानावर गेली होती, त्यानंतर ती घरीच परतली नव्हती. चार दिवसांनी गावातीलच एका बंद घरात तिचा मृतदेह आढळला आहे.

राजकीय वैमनस्यातून चिमुकलीची हत्या झाल्याचा संशय आहे.

रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातून दिया जाईलकर ही 7 वर्षीय चिमुकली बेपत्ता झाली होती.

दिया जाईलकर ही माणगाव तालुक्यातील वावे गावात राहात होती. ती शुक्रवारी संध्याकाळी गावातील दुकानावर सामान खरेदी करायला गेली होती. मात्र ती घरी परतलीच नाही.

बराच वेळ दिया घरी न आल्याने कुटुंबीयांनी तिची शोधाशोध केली. पण दिया सापडली नाही. यानंतर घाबरलेल्या कुटुंबाने दिया बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली.

दरम्यान, सोमवारी रात्रीच्या सुमारास गावातील एका बंद घरात दिया हिचा मृतदेह आढळून आला. यामुळे संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली.

चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या दियाच्या हत्येचं नेमकं कारण काय? हा एकच प्रश्न गावकऱ्यांसमोर आहे.

राजकीय वैमनस्यातून हत्या?

दियाची आई नूतन जाईलकर या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेतून ग्रामपंचायत सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे राजकीय वैमनस्यातून ही हत्या झाली आहे का, ही बाब लक्षात घेऊन पोलीस तपास करत आहेत.

दरम्यान, दियाच्या हत्येच्या निषेधार्थ आज माणगाव परिसरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आल्या आहेत. मारेकऱ्याला तातडीने अटक करुन, त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.