मुंबई : 'मिशन शौर्य' अंतर्गत जगातील सर्वोच्च शिखर माऊण्ट एव्हरेस्ट सर करणाऱ्या चंद्रपूरच्या पाच आदिवासी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 25 लाख रुपयांचं पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे.
आदिवासी विद्यार्थी मुंबईत दाखल झाले असून 1 जूनला राज्यपाल सी विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या धाडसी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
कविदास काठमोडे, उमाकांत मडावी, विकास सोयाम, प्रमेश आळे आणि मनीषा धुर्वे अशी या एव्हरेस्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावं आहेत. एव्हरेस्ट सर करणाऱ्या पाचही विद्यार्थ्यांना गृह विभागात नोकरी देण्याचा प्रस्ताव मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे.
16 मे रोजी या पाच विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट सर करुन शिखरावर ध्वज फडकवला होता. या मोहिमेसाठी दार्जिलिंग, लेह-लडाख या ठिकाणी या त्यांना प्रशिक्षकांकडून गिर्यारोहणाचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं.
11 एप्रिल रोजी हे विद्यार्थी मुंबईहून काठमांडूला रवाना झाले होते. या मोहिमेच्या अंतिम टप्प्यासाठी त्यांच्याबरोबर सपोर्ट स्टाफ व व्यवस्थापकांबरोबरच 15 शेर्पा, एक हाय अल्टिट्यूड तज्ज्ञ डॉक्टरही सहभागी झाले होते.
ज्या विद्यार्थ्यांनी माऊण्ट एव्हरेस्ट चढण्याचा प्रयत्न केला, त्यांनाही दहा लाख रुपयांचं बक्षीस देऊन गौरवलं जाणार आहे. चंद्रपूरचे पालकमंत्री आणि वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात माहिती दिली.
चंद्रपूरच्या एव्हरेस्टवीर आदिवासी विद्यार्थ्यांना प्रत्येकी 25 लाख
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 May 2018 07:50 AM (IST)
जगातील सर्वोच्च शिखर माऊण्ट एव्हरेस्ट सर करणाऱ्या चंद्रपूरच्या पाच आदिवासी विद्यार्थ्यांचा 25 लाखांचं पारितोषिक देऊन गौरव करण्यात येणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -