Palghar News Latest Update: पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक वसाहतीमधील (Tarapur MIDC) भगेरिया इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे तर काही कामगार जखमी झाल्याची घटना घडली आहे. गोपाल गुलजारीलाल सिसोदिया( वय 35), पंकज यादव (वय 32), सिकन्दर (वय 27) अशी या दुर्घटनेतील मृतांची नावं आहेत. या कारखान्यात अठरा कामगार कार्यरत असल्याची माहिती मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या घटनेची दखल घेतली असून जखमींना सर्वोतोपरी मदत देण्याबाबत निर्देश दिले आहेत.
तारापूर औद्योगिक वसाहतीमधील प्लॉट नं डी 117 वरील भगेरीया इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीत उत्पादन सुरू असताना संध्याकाळी 4.30 वाजेच्या सुमारास बॉयलरचा जोरदार स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की यामध्ये दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर एका कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेत 10 पेक्षा अधिक कामगार भाजल्याने गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी बोईसर येथील शिंदे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
जखमींमधील काही कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. स्फोटात मृतांची ओळख पटली आहे. जखमी सर्व कामगार हे ठेका पद्धतीवर काम करणारे असल्याने त्यांची ओळख पटवण्याचे पोलिसांकडून सुरू आहे.
कंपनीत सकाळी 3 वाजता कपड्याच्या डाईंग प्रक्रियेत आवश्यक असणाऱ्या अॅसिडचे उत्पादन सुरू करण्यात आले होते. या प्रक्रियेदरम्यान बॉयलरचे तापमान आणि दबाव क्षमतेपेक्षा अधिक वाढल्याने हा स्फोट झाल्याची प्राथमिक शक्यता कंपनी व्यवस्थापनाकडून वर्तवली गेली आहे.
मात्र बोईसर तारापूर हे आशिया खंडातील सर्वात मोठा औद्योगिक क्षेत्र असून या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल कारखाने आहेत. वारंवार अशा घटना घडत असतानाही संबंधित सुरक्षा विभाग या घटनांकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असून कारखाना स्फोटामध्ये जखमी झालेल्या कामगारांवर चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचार सुरू करावेत, तसेच ज्यांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे त्यांच्याबद्दल शोक व्यक्त केला असून त्यांच्या कुटुंबीयांना मदत करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी एबीपी माझाशी संपर्क साधून सांगितलं.
ही बातमी देखील वाचा-