Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. फेसबुकवर लाईव्ह येत मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. जनतेशी संवाद साधत असताना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी, पोलीस भरती, नोकर भरती यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं म्हटलं आहे. राज्याच्या विकासाच्या दृष्टीनेही आपण प्रयत्न करत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. 


सर्व सण मुक्त आणि मोकळ्या वातारवणात साजरे : मुख्यमंत्री शिंदे 


जनेतला दिवाळीच्या शुभेच्छा देत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ''गेले दोन वर्ष आपल्यावर निर्बंध होते. मात्र यावर्षी सर्व सण मुक्त आणि मोकळ्या वातारवणात साजरे करत आहोत. सकारात्मक बदल आपल्याला सगळीकडे पाहायला मिळत आहे, तसेच कामालाही गती मिळाली आहे. महाराष्ट्राकडे सगळे आशेने आणि विश्वासाने पाहू लागले आहेत.'' 


बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, बाळासाहेब नेहमी सांगायचे समाजकारण आणि राजकारणात समाजकारणाला प्राधान्य द्या. आनंद दिघे यांनी देखील सर्वाना सोबत घेऊन त्यांच्या हक्कासाठी लढायला शिकवले. म्हणून शेतकरी, कष्टकरी, कामगार, शोषित अशा सगळ्यांच्या सर्वांगीण विकासाचा आमचा ध्यास असल्याचं ते म्हणाले आहेत.


मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्यातील 75 वर्षावरील जेष्ठाना मोफत एसटी बस योजना सुरु केली. गेल्या 52 दिवसात या योजेनचा एक कोटीपेक्षा जास्त जेष्ठानी लाभ घेतला. दिवाळीसाठी शिधा पत्रिका धारकांना केवळ 100 रुपयात आनंदाचा शिधाचे वाटप करण्याचा निर्णय घेतला. अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना एनडीआरफच्या मदतीच्या दुप्पट आणि दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टर मर्यादेवर नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतला. यामध्ये जवळपास 30 लाख शेतकऱ्यांना चार लाख कोटींची मदत मिळत आहे, असं ते म्हणाले आहे.  


शिंदे म्हणाले की, पोलीस भरतीला आम्ही सुरुवात केली आहे. 20 हजार पोलीस शिपाईची पदे भरण्याची प्रकारीया सुरु करण्यात आली आहे. यासोबतच राज्यातील विविध विभागातील 75 हजार पदांची भरती लवकरच भरण्याची प्रक्रिया देखील सुरु झाली आहे. ते म्हणाले की, आरोग्यासाठी दुप्पट निधी देण्याचा प्रयत्न आहे. राज्यात 700 बाळासाहेब ठाकरे औषध केंद्र सुरु करणार आहे. माता सुरक्षित तर घर सुरक्षित यात चार कोटी महिलांची आरोग्य तपासणी सुरु आहे. वाहतूक आणि औषध खर्चसाठी  प्रत्येक जिल्ह्याला दोन कोटींचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच नवी मुंबई, ठाण्यात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले आहेत.