नवी मुंबई : पनवेल मधील जे मात्रे चॅरिटेबल ट्रस्ट आणि शेतकरी कामगार (Shekap) पक्षाकडून दिवाळीसाठी ( Diwali) पनवेलमध्ये विविध ठिकाणी दिवाळीच्या शिधा वाटप केंद्र चालू करण्यात आले आहे. प्रत्येकाची दिवाळी गोड व्हावी यासाठी प्रत्येकाला रवा, मैदा व साखर बाजारभावापेक्षा कमी दरात ना नफा ना तोटा या तत्त्वावर वाटप करण्यात येत आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रीतम म्हात्रे यांच्याकडून गेल्या सात वर्षांपासून ही योजना राबवण्यात येत आहे. यंदा देखील म्हात्रे यांच्याकडून ही योजना राबवली जात आहे.  


दिवाळी सण म्हटला की घराघरात फराळ हा आलाच.  मात्र काही गरिबांना दिवाळी साजरी करता येत नाही. अशा लोकांना देखील आनंदाने दिवाळी साजरी करता यावी या हेतून म्हात्रे यांच्याकडून  ही योजना राबवण्यात येत आहे.  जे मात्रे चॅरिटेबल ट्रस्ट आणि शेतकरी कामगार पक्षातर्फे पनवेलमध्ये विविध ठिकाणी  शिधा वाटप केंद्र चालू करण्यात आले आहे. या केद्रातून प्रत्येकाला रवा, मैदा आणि साखर बाजारभावापेक्षा कमी दराने देण्यात येत आहे.  


राज्य सरकारकडून गोरगरीब जनतेला दिवाळीमध्ये दिलासा मिळावा यासाठी आंनदाचा शिधा या योजने अंतर्गत शंभर रूपयांत साखर , तेल, रवा आणि डाळ देण्यात येत आहे. परंतु, सरकारचा हा आनंदाचा शिधा राज्यातील अनेक रेशन दुकानांपर्यंत पोहोचलाच नाही. त्यामुळे जनतेतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या या कीटवर पंतप्रधन नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो लावण्यात येणार असून एवढ्या कमी वेळात प्रत्येक कीटवर हे फोटो लावणे कठिण होत आहे. त्यामुळे सरकारचा हा शिधा जनतेपर्यंत पोहोचला नाही. त्यामुळे विरोधकांकडून देखील कीटवरील फोटोंवरून सरकारवर टीका केली जात आहे. नवी मुंबई , पनवेल मधील अनेक भागातील गोरगरीब जनतेला आनंदचा शिधा या योजनेचा अद्याप लाभ मिळालेला नाही. मात्र, दुसरीकडे जे एम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट  आणि शेतकरी कामगार पक्षाकडून राबवलेल्या या योजनेचा लोकांना फायदा मिळत आहे.


गेल्या सात वर्षापासून शेकापकडून पनवेल परिसरात 90 रूपयांत शिधा वाटप योजना सुरू आहे. दरवर्षी दिवाळीमध्ये साधारण 18 ते 20 हजार कुटूंबांच्या फराळासाठी मदत पोचवली जाते. या वर्षी पनवेलमध्ये तीन ठिकाणी आणि उलवेमध्ये एका ठिकाणी पांडाल टाकून अन्नधान्य दिले जात आहे.  


शेकापकडून विधायक उपक्रम 
राज्य सरकारकडून शंभर रूपयांमध्ये एक किलो साखर, एक किलो खाद्य तेल, एक किलो डाळ आणि एक किलो रवा देण्यात येत आहे. शेकापकडून 90 रूपयांमध्ये एक किलो रवा, एक किलो मैदा आणि एक किलो साखर देण्यात येत आहे. यात उल्लेखनीय बाब म्हणजे सरकारकडून देण्यात येणाऱ्या कीटवरील फोटो आणि हे कीट अद्याप जनतेपर्यंत पोहोचले नाही त्यामुळे विरोधी पक्षांकडून टीका करण्यात येत आहे. परंतु, राज्यातील अगदी छोटा पक्ष असलेल्या शेकापकडून टीका करत बसण्यापेक्षा गोरगरीब जनतेला प्रत्यक्षात मदत करण्यास सुरूवात केली आहे. पनवेलमधील हजारो नागरिकांनी शेकापच्या या योजनेचा लाभ घेतलाय. सरकारच्या योजनेवर टीका करण्यात वेळ घालवणे आणि त्यातून एकमेकांना विरोध करण्यापेक्षा शेकापने गोरगरीबांच्या दिवाळीला थोडासात हातभार लावला आहे. शेकापकडून देण्यात येणाऱ्या वस्तू सरकार देत असलेल्या वस्तूंपेक्षा कमी असल्या तरी या वस्तुंसाठी शेकापकडून पक्षाच्या फंडातून हा खर्च करण्यात येत आहे. त्यामुळे शेकापच्या या विधायक उपक्रमाचे राज्यभरातून कौतुक होत आहे. 


सरकारचा आनंदाचा शिधा अद्याप रेशनमध्येच नाही
राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या आनंदाचा शिधा योजनेची घोषणा करून जवळपास 15 दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले आहेत. परंतु, हा शिधा अद्याप रेशनपर्यंतच पोहोचला नाही. त्यामुळे लोक रेशनधान्य दुकानांपर्यंत फक्त धडका मारून परत जात आहेत. त्यामुळे सरकाचा हा आनंदाचा शिधा अद्याप कागदावरच आहे. कारण दिवाळीच्या सणाला सुरूवात झाली आहे. आज वसू बारस साजरी केली जात आहे. दिवाळी झाल्यानंतर सरकारचा हा शिधा मिळणार काय? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात असताना शेकापकडून मात्र प्रत्यक्षात शिधा वाटप करण्यास सुरूवात केली. शेकापचा हा शिधा हजारो कुटुंबापर्यंत पोहोचला देखील. त्यामुळे जनतेकडून शेकापचे आभार मानले जात आहेत. 


रेशनिंग दुकानेच बंद 
दिवाळीमध्ये गोरगरीब जनतेला दिलासा मिळावा यासाठी राज्य सरकारकडून आनंदाचा शिधा ही योजना सुरू करण्यात आली. मात्र आज दिवाळीची  बारस असूनही अद्याप नवी मुंबईत या योजनेचा लाभ गोरगरिबांना मिळालेला नाही. शहरात 48 हजार कुटूंबांना या योजनेअंतर्गत शंभर रूपयांत चार पदार्थ मिळणार आहेत. डाळ, तेल, साखर आणि रवा यांचा समावेश आहे. रेशनिंग दुकांमध्ये आनंदाचा शिधा योजनेतील सर्व वस्तू आल्या नसल्याने वाटप सुरू करण्यात आलेले नाही. लोकांच्या रोषाला सामोरे जाण्यापेक्षा रेशनिंग दुकानेच बंद ठेवण्यात आलेली आहेत. त्यामुळे दिवाळीची बारस आली तरी आंनदाचा शिधा मिळत नसल्याने आम्ही फराळ बनवायचा कधी असा प्रश्न गोरगरीब जनता विचारत आहे.