Pune Dog News :  उठा उठा दिवाळी आली भू-भू स्नानाची वेळ झाली,असं म्हणत यंदा पुणेकर (Pune) दिवाळी साजरी करणार आहे. पुण्यात अनेक प्राणीप्रेमी (Dog) आहेत त्यात वेगवेगळ्या जातीची कुत्री पाळणं हा अनेक पुणेकरांचा आवडता छंद आहे. त्यामुळे यंदा पुणेकर कुत्र्यांना देखील अभ्यंगस्नान घालणार आहे आणि शिवाय त्यांच्यासोबत दिवाळी पहाट देखील साजरी करणार आहेत.


पुणेकरांच्या कल्पनाशक्तीला सगळेच दाद देतात. पुणेकर कधी कुत्र्यांचा वाढदिवस साजरा करतील, कधी वेगवेगळे आंदोलनं करतील, मांजरीचा वाढदिवस करतील तर कधी वेगवेगळ्या ठिकाणी टोमण्यांच्या पाट्या लावतील. यंदा मात्र पुणेकरांनी प्राणी प्रेमींसाठी भन्नाट आयडिया केली आहे. दिवाळीच्या दिवसात अभ्यंगस्नानाला विशेष महत्व असतं. यावर्षी पुणेकर कुत्र्यांना देखील अभ्यंगस्नान घालणार आहे आणि कुत्र्यांसाठीही दिवाळी पहाटचं आयोजन केलं आहे. त्यांच्या या आयडियाला प्राणीप्रेमी पुणेकर चांगला प्रतिसाद देखील देताना दिसत आहेत.


पुण्यातील टेल्स ऑफ द सिटी हे कुत्र्यांसाठीचं कोथरुडमधील ग्रुमिंग आणि केअर सेंटर आहे. या ठिकाणी कुत्र्यांना वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण दिलं जातं. पोहणं, खेळणं शिवाय त्यांच्या आरोग्याची देखील काळजी घेतली जाते. प्राणीप्रेमी मागील काही वर्षांपासून या ठिकाणी आपल्या घरातील महत्वाचा सदस्य मानत असलेल्या कुत्र्यांना घेऊन येतात. त्यांच्याशी खेळतात. त्यांना पोहणं शिकवतात. याच ठिकाणी यंदा दिवाळीच्या पाच दिवसात कुत्र्यांच्या अभ्यंगस्नानाचं आणि दिवाळी पहाटचं आयोजन केलं आहे. 


ही बातमी देखील वाचा- Court on Stray Dogs : आता मोकाट कुत्र्यांवरील प्रेम येणार अंगलट; कारवाईत अडथळा आणल्यास अटक!


कुत्र्यांचं अभ्यंगस्नान कसं असेल?
बाजारात कुत्र्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत. त्यात शॅम्पू, साबण, खेळणी, मसाज तेल, मसाज पॅक यांचा यात समावेश आहे. दिवाळीच्या निमित्ताने ज्या प्रकारे आपण उटणं लावून अंघोळ करतो. त्याच प्रकारे वेगवेगळ्या तेलाने कुत्र्याची मसाज केली जाणार आहे. त्यानंतर त्याला मसाज पॅक लावण्यात येणार आणि त्यांची आंघोळ करण्यात येणार आहे. यात दिवसात घरातील सदस्यांप्रमाणे कुत्र्यांना देखील सजवण्यात येणार आहे.


पुण्यात भरपूर प्रमाणात प्राणीप्रेमी आहे. घरच्या प्राण्यांशिवाय पुणेकर बाहेर देखील जाणं पसंत करत नाहीत. त्यामुळे ते प्राण्याची काळजी घेत असतात. यंदा याच प्राणीप्रेमी पुणेकरांसाठी आम्ही अभ्यंगस्नानाचा प्रयोग करणार आहोत. यासाठी आम्हाला चांगला प्रतिसाद देखील मिळतो आहे. दरवेळी आमच्याकडे कुत्र्यांना वेगवेगळं शिक्षण दिलं जातं, ग्रुमिंग केलं जातं. मात्र यावर्षी आम्ही प्राणी प्रेमी पुणेकर आणि त्यांच्या कुत्र्यांबरोबर स्पेशल दिवाळी साजरी करणार आहोत, असं टेल्स ऑफ द सिटीच्या प्रशिक्षक आभा भोसेकर यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.