मुंबई : पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर आणि पशुसंवर्धन विभागाचे सचिव अनुपकुमार यांच्यात बेबनाव असल्याचं समोर आलं आहे. सचिवांनी केलेल्या 66 अधिकाऱ्यांच्या बदल्या मंत्री महादेव जानकर यांनी रद्द केल्या आहेत. या बदली प्रक्रियेत सचिवांनी विश्वासात न घेतल्याचा आरोप जानकरांनी केला आहे. काल (6 जून) झालेल्या या घडामोडींची जोरात चर्चा सुरु आहे.


पशुसंवर्धन विभागाचे सचिव अनुपकुमार यांच्या आदेशानंतर कोकण विभागातील 14, विदर्भातील 37 पशुधन विकास अधिकारी तसंच सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन दर्जाच्या 15 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. 31 मे 2019 रोजी हे आदेश काढण्यात आले. या अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करावं. संबंधित अधिकाऱ्यांनी बदलीच्या पदावर हजर झाल्यानंतर लगेचच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्रासह रुजू अहवाल पशुसंवर्धन आयुक्तांकडे द्यावा, असं आदेशात म्हटलं होतं.

काही अधिकाऱ्यांनी नियुक्तीच्या ठिकाणाबाबत नाराजी व्यक्त केली. तसंच पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्याकडे तक्रारही केली. परंतु या प्रक्रियेबाबत अनभिज्ञ असल्याचं सांगितलं. सचिव स्तरावरुन बदल्या झाल्याचं समजल्यानंतर त्यांनी तातडीने या प्रक्रियेला स्थगिती दिली.

महादेव जानकर काय म्हणाले?

"बदल्यांचे अधिकार संबधित मंत्र्यांनाच असतात. गेल्यावर्षी वर्षभरासाठी बदल्यांचे अधिकार सचिवांना दिले होते. सचिवांनी मला न विचारतातच बदल्या केल्या. माझ्यासमोर बदल्यांची फाईल आलीच नाही. काही तक्रारी आल्यावर मी चौकशी केली. त्यात या बदल्या झाल्याचं समोर आलं. त्यामुळे बदल्यांना स्थगिती दिली आहे," असं स्पष्टीकरण महादेव जानकर यांनी दिलं.

बदल्यांमागे मोठं अर्थकारण : डॉ. अविनाश बेलकोणीकर

पशुसंवर्धन विभागातील बदल्यांच्या मागे मोठे अर्थकारण असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यक संघटनेचे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश बेलकोणीकर यांनी केला आहे. "अपेक्षेप्रमाणे बदली मिळवण्यासाठी 2 लाख ते 15 लाख रुपये मोजावे लागतात," असा गंभीर आरोप बेलकोणीकर यांनी केला आहे. तसंच या सर्व बदल्यांची सक्षम यंत्रणेकडून चौकशी करण्याची मागणी बेलकोणीकर यांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना पत्र लिहून केली आहे. "2005 मधील शासन निर्णयानुसार 31 मे पर्यंत बदल्यांचे अधिकार हे पशुसंवर्धन मंत्र्यांच्या सहमतीने सचिवांना असतात. पण 31 मे नंतर बदल्या करायच्या झाल्यास त्याचे अधिकार थेट मुख्यमंत्र्यांना आहेत. मात्र सध्या झालेल्या बदल्या सचिवांनी मंत्र्यांना विश्वासात न घेता केल्या आणि जेव्हा मंत्र्यांकडे तक्रारी पोहोचल्या तेव्हा त्यांना बदल्यांची माहिती मिळाली," असं बेलकोणीकर म्हणाले.