रायगड : उरणच्या खोपटा पुलावर लिहिलेल्या वादग्रस्त मजकूर प्रकरणाचा 72 तासांत छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. वादग्रस्त मजकूर लिहून दहशत पसरवल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी अमीर उल्लाहशेख या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. हा आरोपी मूळचा उत्तर प्रदेशमधील सिद्धार्थ नगरचा राहणारा आहे. तो गेली 10 वर्षे खोपटा येथे भाडेतत्वावर राहतो आणि एका खाजगी ट्रान्सपोर्ट कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करतो.

दरम्यान हा आरोपी मानसिक रुग्ण असून त्याच्यावर दोन वर्षांपासून उपचार सुरु आहेत. आरोपी अमीर उल्लाह शेखने हा संदेश का आणि कशासाठी लिहिला याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. या आरोपीकडून आणखी काही धागेदोरे मिळतात का याबाबत तपास केला जात आहे.



उरणच्या खोपटा पुलावर लिहिण्यात आलेले संदेश हे काळ्या शाईच्या मार्करने लिहिण्यात आले असून संदेशात बगदादी, हाफिस सईद, आयसीस अशी आक्षेपार्ह नावं आहेत.

काय आहे प्रकरण?

उरणमधील खोपटा उड्डाणपुलावर आयसीस या दहशतवादी संघटनेचा आणि त्या संघटनेचा म्होरक्या अबु अल बगदादी यांचा उल्लेख आढळल्यानं खळबळ उडाली होती. एवढंच नाही तर अनेक चित्रांमध्ये जेएनपीटी जहाज, विमानतळ, पेट्रोलपंप दाखवण्यात आले होते. लिहिलेला संदेश हा देवनागरी आणि इंग्रजी भाषेत होता. त्यात धोनी, आम आदमी पार्टी, केजरीवाल, हाफिज सईदसोबत कुर्ला, गोऱखपूर या ठिकाणांचा उल्लेख करण्यात आला होता.

रात्रीच्या वेळी हा प्रकार घडला असल्याने पोलिसांनी या घटनेचा गांभीर्यानं तपास करत आहेत. उरण पोलिसांनी समुद्रातील गस्त वाढवली असून सर्व सुरक्षा य़ंत्रणांना सतर्कतेच्या सूचना दिल्या होत्या.