मुंबई : जेष्ठ सनदी अधिकारी दिनेश वाघमारे यांची राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नावाची शिफारस राज्यपालांकडे केल्यानंतर राज्यपालांनी त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. राज्यातील महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी नवीन निवडणूक आयुक्तांवर असणार आहे. दिनेश वाघमारे हे सचिव दर्जाचे अधिकारी आहेत. 


मंत्रिपरिषदेने नव्या निवडणूक आयुक्तांची निवड करण्याचे सर्वाधिकार हे मुख्यमंत्र्यांना दिले होते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी दिनेश वाघमारे यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यानुसार राज्यपालांची दिनेश वाघमारेंच्या नावाला मंजुरी मिळाली आहे. त्यानंतर राज्य सरकारच्या वतीने वाघमारेंच्या नियुक्तीचा एक आदेश जाहीर करण्यात आला आहे.


दिनेश वाघमारे हे पुढच्या पाच वर्षांसाठी राज्याचे निवडणूक आयुक्त असतील. त्यानंतर त्यांना पुनर्नियुक्ती मिळणार नाही. 


काय म्हटलंय सरकारच्या आदेशात? 


भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद २४३-के व अनुच्छेद २४३-झेडए आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त (अर्हता व नियुक्ती) अधिनियम, १९९४ मधील तरतुदीस अनुसरुन महाराष्ट्राचे राज्यपाल, श्री. दिनेश टी. वाघमारे यांची, दिनांक २० जानेवारी, २०२५ पासून किंवा त्यानंतर ते ज्या तारखेला कार्यालयात आपल्या पदाचा कार्यभार घेतील, त्या तारखेपासून राज्य निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक करीत आहेत. श्री. दिनेश टी. वाघमारे हे सदर पदाचा कार्यभार स्वीकारतील त्या दिनांकापासून ५ वर्षांकरीता हे पद धारण करतील आणि ते पुनर्नियुक्तीस पात्र असणार नाहीत. त्यांच्या सेवेच्या इतर अटी व शर्ती ह्या राज्य निवडणूक आयुक्त (अर्हता व नियुक्ती) अधिनियम, १९९४ मधील तरतुदीनुसार असतील.


राज्य निवडणूक आयुक्तांवर जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्राम पंचायती, नगरपालिका व महानगरपालिका यांच्या मतदार याद्या तयार करण्याबाबतचे अधिक्षण, संचालन व नियंत्रण करण्याची तसेच त्यांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी राहील.