मुंबई : महाराष्ट्रात पालकमंत्री पदावरून वादंग निर्माण झाल्याचं दिसून येतंय. शनिवारी रात्री राज्यातील जिल्ह्यांसाठी पालकमंत्रिपदाची नावं सामोरे आली. पण या यादीतील दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाला रविवारी स्थगिती देण्यात आली. हे दोन जिल्हे म्हणजे रायगड आणि नाशिक. रायगडमध्ये पालकमंत्रिपदासाठी आदिती तटकरे यांची वर्णी लागली होती. तर गिरीश महाजन यांचे नाव नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून घोषित झाले होते. या नव्या वर्णीवर शिंदेंच्या आमदार, मंत्र्यांनी आक्षेप घेतला आणि हे दोन जिल्हे वेटिंगवर गेले. 


या मुद्यांवर आता विरोधी पक्षाने सरकारला टोले लगावले आहेत. एकनाथ शिंदेंची गरज संपल्यानं त्यांना बाजूला करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, आता नवा ‘उदय’ होईल असे भाकीत वडेट्टीवारांनी केलं. याला संजय राऊत यांनी दुजोरा दिला. 


उदय सामंत मुख्यमंत्र्यांसोबत दौऱ्यावर


राज्याचे उपमुखमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या त्यांच्या गावी म्हणजे दरे गावी आहेत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस गेले आहेत. या दावोस दौऱ्यात मुख्यमंत्र्यांसमवेत उद्योगमंत्री उदय सामंत हेदेखील आहेत. एकीकडे शिंदेचे मंत्री हे पालकमंत्री पदावरून वाद करत असताना उदय सामंत हे मुख्यमंत्र्यांसमवेत दावोसला गेल्याने विरोधकांनी उदय सामंत यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे.


शिंदेंनी नागा साधूंसोबत गेलं पाहिजे, राऊतांचा टोला


नाशिकचे आणि रायगडचे पालकमंत्रिपद शिवसेनेच्या वाट्याला आलेलं नाही. त्यामुळं उपमुखमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज आहे अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. यातच संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांच्यावर संधी साधत टोलेबाजी केली. उपमुख्यमंत्री यांचे दरेगाव हे त्यांचा दावोस आहे. एकनाथ शिंदे हा कायम अस्वस्थ आत्मा आहेत. त्यांनी खरंतर नागा साधूंबरोबर कुंभमेळ्यात जाऊन बसायला पाहिजे. नागा साधू अस्वस्थ असतात आघोरी विद्या करत असतात असं संजय राऊत म्हणाले. 


राऊतांनी विजय वड्डेटीवार यांनी केलेल्या वक्तव्याला दुजोराही दिला. त्यामुळं शिवसेनेत नवा उदय हा चर्चेचा विषय झाला आहे. राऊतांनी थेट भाजपवर बोलत म्हटलं की, उदय सामंत यांच्यासोबत 20 आमदार आहेत अशी माझी माहिती आहे. सरकार स्थापनेच्या वेळेस हे निश्चित झालं होतं. पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकली मुठ सवा लाखाची. भाजपनेच उदय सामंत यांना दावोसला नेले आहे असा थेट आरोप राऊतांनी केला. 


विजय वड्डेटीवार आणि संजय राऊत यांच्या टिकेला उदय सामंत यांनी थेट परदेशातून उत्तर दिले आहे. राऊतांनी केलेले वक्तव्य हे बालिशपणा आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या उठावात मी सामिल होतो, एकनाथ शिंदे आणि माझे संबध हे राजकारणापलीकडचे आहे असे सांगत सामंत यांनी शिंदेसोबतची त्यांची जवळीक मांडली.


एकीकडे शिवसेनेत नवा उदय होणार अशी वक्तव्यं महाविकास आघाडीचे नेते म्हणजे संजय राऊत आणि काँग्रेसचे विजय वड्डेटिवार करत आहेत. पण उदय सामंत यांनी थेट आता विजय वड्डेटीवार किती वेळ भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना भेटले याची माहिती आपल्याकडे आहे असे वक्तव्य केलं. 


वड्डेटीवार यांनी केलेलं वक्तव्य आणि त्याला राऊतांनी दिलेला दुजोरा जर पाहिला तर ही संपूर्ण चर्चा भाजपच्या अवतिभोवती आहे. तर उदय सामंत यांनी वड्डेटीवार यांना दिलेलं उत्तर हेही भाजपशी निगडीत आहे. यावर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे की, मविआचे नेते सत्तेबाहेर गेल्याने त्यांची मानसिकता गेली आहे. त्यांनी आमच्याकडं लक्ष न देता काँग्रेसकडे लक्ष द्यावं असा सल्लाही त्यांनी दिला. 


महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नाराजी आणि नवा उदयाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हे एकमेकांवर आरोप करत बंड होणार असे बोलत आहेत. पण याही नव्या उदयात केंद्रबिंदू भाजपच आहे. त्यामुळं आगामी काळातील महाराष्ट्रातील राजकारण कसे असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल.


ही बातमी वाचा: