सातारा : पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरून एकनाथ शिंदे नाराज असून त्यामुळेच ते दरेगावाला निघून गेले असल्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर त्यावर स्वतः शिंदेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. गावी आलो म्हणजे नाराज झालो असं काहीजण म्हणतात. पण या जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी, पर्यटन जिल्हा म्हणून विकसित करण्यासाठीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी दरेगावात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. महायुती भक्कम असून त्यासंदर्भात काही अडचणी आल्यास तीनही नेते एकत्र बसून निर्णय घेऊ असंही एकनाथ शिंदे म्हणाले. 


रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे. भरत गोगावले हे रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी इच्छुक होते. त्यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, भरत गोगावलेंनी अनेक वर्षे रायगडसाठी काम केलं आहे. त्यामुळे अपेक्षा ठेवण्यात वावगं काय आहे. 


पर्यटनाचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी गावी 


नाराज झालो म्हणून नाही तर नवीन महाबळेश्वरचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी गावी आलोय असं एकनाथ शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे म्हणाले की, "हा सगळा मोठा परिसर, 235 गावांचा पर्यटन विकासाचा हा प्रकल्प आहे. पर्यटनाचा जिल्हा विकसित व्हावं म्हणून काम करतोय. या भागाचा कायापालट करणे, या लोकांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवणे हाच आपला उद्देश आहे."


रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती


नाशिक आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी दरे गाव गाठलं. त्यामुळे शिंदे नाराज असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं. पालकमंत्र्यांची य़ादी जाहीर झाल्यानंतर अवघ्या 24 तासातच रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाच्या स्थगितीची घोषणा कऱण्यात आली. एकनाथ शिंदेंचा फडणवीसांना फोन गेल्यानंतर फडणवीसांनी नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री नियुक्तीला स्थगिती दिल्याचं समजतंय. 


एकनाथ शिंदेंनी भरत गोगावले आणि दादा भुसे यांच्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी केल्याचं समजतंय. रायगडचं पालकमंत्रिपद आदिती तटकरेंना आणि नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांना देण्यात आलं होतं, जे आता स्थगित करण्यात आलं आहे. 


 



ही बातमी वाचा: