बीड : थकीत वीज बिलापोटी राज्यातील हजारो जिल्हा परिषदेच्या शाळांचे वीज कनेक्शन कापण्यात आले. मात्र वीज नाही म्हणून हातावर हात ठेवून बसण्यापेक्षा अनेक हातांना एकत्र करुन शाळा डिजिटल करण्याचा विडा पूनम माने या शिक्षिकेने घेतला आणि वीज नसलेल्या शाळेत आज डिजिटल क्लासरुम सुरु झाली आहेत.


अंबाजोगाईमधील वाघाळवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेतील विजेचे मीटरच महावितरणने थकीत वीज बिलामुळे काढून नेले. अशा काळात पूनम माने या शिक्षिका या शाळेत रुजू झाल्या. डिजिटल शाळेचे स्वप्न घेवून आलेल्या या शिक्षिकेचा हिरमोड झाला. पण यामुळे त्या थांबल्या नाहीत. त्यांनी स्वतः चे 70 हजार रुपये शाळेसाठी दिले आणि गावकऱ्यांना डिजिटल शाळेसाठी मदत करण्याचे आवाहन केले. यातून तब्बल एक  लाखाचा निधी उभा राहिला.

शाळेवर बसवलेल्या या सोलर पॅनलमुळे आज चोवीस तास वीज उपलब्ध असते आणि ही मुलं दिवसभर डिजिटल क्लासरुममध्ये रममाण झालेली असतात. कधीकाळी अंधारात चालणाऱ्या या वर्गात आता टॅबवर मुलं शिक्षण घेऊ लागली आहेत.



या शाळेतील भिंती इतक्या बोलक्या आहेत की, त्याकडे नुसते बघितले तरी सारे ब्रह्मांड फिरुन आल्याची अनुभती येते. वायफायद्वारे इंटरनेटनी जोडलेल्या टॅबवर मुलांना वेगवेगळ्या अॅप्सच्या माध्यमातून आधुनिक शिक्षणाचे धडे दिले जात आहेत.. ज्ञानरचनावादामुळे या शाळेतील मुलांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ झाली आहे. ज्या वयात मुलांना पाटीवर पेन्सिल फिरवायलाही जड जाते, तिथे ही मुले सराईतपणे टॅबवर  बोटं फिरवत आहेत.

पहिली ते चौथीपर्यंतच्या या शाळेत सेमी इंग्रजी आहे. त्यामुळे घरीसुद्धा मुलं बोलताना इंग्रजी शब्दांचा वापर करु लागली आहेत. शहरातील महागड्या इंग्लिश स्कूलमधून मिळणाऱ्या शिक्षणारेक्षा या जिल्हा परिषदेच्या शाळेतून मिळणारे शिक्षण ग्रामीण भागातील या पालकांसाठी फायद्याचे ठरु लागले आहे. म्हणूनच पालकांनीही या डिजिटल क्लासरुमसाठी भरभरुन मदत केली आहे.

जिल्हा परिषद शाळांची आवस्था बिकट आहे. मात्र जर पूनम माने यांच्यासारख्या शिक्षिका असतील, तर या मराठी शाळा इंग्रजी माध्यमातील शाळांपेक्षा निश्चितच कमी नाहीत, हेही नक्की.