कोल्हापूर : आजवर आपण पाण्यातलं लग्न, हवेतलं लग्न पाहिलं असेल... पण आज कोल्हापुरात एक लग्न पार पडलं. जे तारांना लटकून करण्यात आलं. तेही बाजीप्रभूंनी लढवलेल्या पावन खिंडीत.

 

कोल्हापूरचा गिर्यारोहक जयदीप जाधव आणि पाडळीची रेश्मा पाटील या दोघांनी अभिनव पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि पावन खिंडीतला जखलाईचा कडा याठिकाणी दोन दिवसांपासून तयारी करण्यात आली. यावेळी फक्त जोडपंच नाही. तर भटजी बुवाही कमरेला पट्टा बांधून दाम्पत्यासोबत सुमारे हजार फूट खोल दरीच्या मधोमध लटकत होते.

 

यावेळी सुमारे शंभर पाहुणे मंडळींनी दरीच्या किनाऱ्यावर उभे राहून नवदाम्पत्याला शुभाशीर्वाद दिले. गिर्यारोहणाला चालना देण्यासाठी आणि संसाराची सुरवात थरारक करण्यासाठीच या दोघांनी असं अभिनव लग्न केल्याची प्रतिक्रिया नवदाम्पत्याने दिली.