लातूर : दुष्काळामुळं जवळपास वर्षभर लातूरचे नळ कोरडे होते. पावसाचं आगमन होऊनही लातूरमधल्या टँकरच्या आणि वॉटर एक्स्प्रेसच्या फेऱ्या काही थांबल्या नव्हत्या. मात्र काल रात्री वरूणराजाची लातूरवर अशी काही कृपा झाली, की दुष्काळग्रस्त लातूर पाणीदार झालं. त्यामुळं लातूरकरांची तहान आता टँकर आणि वॉटर एक्स्प्रेसनं नव्हे, तर नळाच्या पाण्यानं भागवली जाणार आहे. लातुरात तब्बल दहा महिन्यानंतर नळाला पाणी येणार आहे.

 

लातूर शहराला पुढची आठ महिने पुरेल एवढा नागझरी आणि साईबंधाऱ्यात पाणीसाठा झाला आहे. अजूनही पाण्याची आवक सुरू आहे.

 

लातुरात वॉटर एक्स्प्रेसने पाणी पुरवलं जात होता. या गाडीच्या एका फेरीवर 14 लाख खर्च होत होतं.

 

शहराबरोबर ग्रामीण भागातही चांगला पाऊस पडला. तेरणा नदी भरभरून वाहू लागली. तेरणेसह मांजरा, रेणा, जाना, घरणी, तावरजा, मुडगुळ नदीसह छोटे मोठे ओढे भरून वाहिले. वेगवेगळ्या ठिकाणच्या चार बंधाऱ्यावरील 21 दरवाजे उघडण्यात आले आहेत.

 

लातूरच्या निलंगा तालुक्यातही तेरणेच्या नदीकाठच्या गावांतल्या पिकांची अशी अवस्था झाली. लातूरचा शेजारी दुष्काळी उस्मानाबादच्या लोहारा, उमरग्यात पाऊस धो-धो कोसळला. दाळींबला 148 मिमीची अतिवृष्टी झाली. लोहाऱ्याच्या वाडी वडगावात 40 घरात पाणी शिरलं. लातूर उस्मानाबादकरांना प्रिय रामलिंगच्या धबधबा वाहू लागला.