उस्मानाबाद : राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना जे औरंगाबादमध्ये जमलं नाही ते माजी मंत्री तानाजी सावंत यांनी उस्मानाबादमध्ये करून दाखवलं. शिवसेनेच्या दोन आमदारांनी जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाचा पराभव केला. माजी मंत्री तानाजी सावंत यांनी भाजपला साथ देत उस्मानाबाद जिल्हा परिषदेमध्ये आपल्या पुतण्याला उपाध्यक्ष केलं. तानाजी सावंत यांनी महाआघाडीच्या उमेदवारांसाठी मतदान करावं असा आदेश खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देऊनही तानाजी सावंतांनी तो ऐकला नाही. एवढेच नाही तर मातोश्री वरून आलेले फोनही घेतले नाहीत.

राज्यात तीन पक्षांच्या महाआघाडीचे सरकार आलं. मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे बसले. तरीही शिवसेनेच्या आमदारांना पूर्वी जशी शिवसेनेची, ठाकरे कुटुंबीयांची भीती वाटायची तसं होताना दिसत नाही. आमदार सावंतांसह उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचे दुसरे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्याही गटाने भाजपाला मदत केली असल्याचे बोलले जात आहे.

आज जिप अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मतदानासाठी आले. त्यांच्यासोबत माजी मंत्री तानाजी सावंतांचे सहा सदस्य होते. मतदान झाले तेव्हा तानाजी सावंतांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आणि तानाजी सावंतांचा पुतण्या उपाध्यक्ष झाला.

जिल्हा परिषदेची अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ही तुलनेने लहान पदं. या लहान पदासाठी सुद्धा तानाजी सावंत यांनी उद्धव ठाकरेंचा आदेश डावलला. त्याचं कारण आहे तानाजी सावंतांची नाराजी. मंत्रिपद न मिळाल्यामुळे तानाजी सावंत पक्षावर नाराज आहेत. त्यांची मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्याशी बाचाबाची झाल्याची चर्चा आहे.

फक्त तानाजी सावंत नाही तर उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचे दुसरे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्याही गटाने भाजपाला मदत केली. तीन वेळेस आमदार झालेल्या ज्ञानराज चौगुले यांनी मंत्रिपदाची आशा होती.


देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातल भाजपचे सरकार गेलं. फडणवीसांचे एकेकाळचे मित्र उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले खरे. पण मंत्रीपदाच्या वाटपापासून नाराजांची चर्चा आहे. ती कधी खात्यांवरून होते तर कधी खुर्चीवर बसण्यावरुन. त्यात आता खुद्द तानाजी सावंत यांच्यासारखे आमदार पक्षाचा आदेश उघड धुडकावून लावत आहेत. आता तानाजी सावंत यांच्यावर काय कारवाई होणार का? याकडे लक्ष लागून आहे.

महाआघाडीत आपल्या पुतण्याला उपाध्यक्षपद मिळत नसल्याने तानाजी सावंत यांनी भाजपसोबत घरोबा केला आहे. बंडखोरीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: तानाजी सावंत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अनिल देसाई यांनीही फोनद्वारे त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तानाजी सांवत यांच्याकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही.

उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी अस्मिता कांबळे आणि उपाध्यक्षपदासाठी धनंजय सावंत हे भाजपचे उमेदवार विजयी झाले. तानाजी सावंत आपल्या सहा सदस्यांसह भाजपच्या गोटात गेल्यामुळे भाजपकडे 32 सदस्य झाले.