मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे अद्याप कोणत्याही पदाचं नेतृत्त्व करताना दिसले नव्हते. मात्र येत्या 23 तारखेला मनसे पक्षाच्या अधिवेशनामध्ये अधिकृतपणे अमित ठाकरे यांचं लॉन्चिंग होणार आहे. अमित ठाकरेंना पक्षात एक मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे.


ठाकरे हे कधीही स्वत: राजकारणात उतरले नव्हते मात्र आमदार आदित्य ठाकरेंनी स्वत: मैदानात उतरुन ही प्रथा मोडली, त्यामागोमाग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आता अमित ठाकरेही राजकारणात उतरणार आहेत. 23 जानेवारी म्हणजेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या दिवशी राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे पक्षांतर्गत एक मोठी जबाबदारी स्वीकारणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.


Amit Thackeray | राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे सक्रीय राजकारणात? | मुंबई | ABP Majha



आता नवा चेहरा समोर आणून मनसे आपला नवा राजकीय प्रवास सुरु करणार का याचं उत्तर 23 तारखेला सर्वांना मिळणार आहे. अमित ठाकरेंनी स्पष्टपणे अद्याप राजकीय भूमिका मांडली नाही. मनसे मेळावे, सभा अशा सर्व ठिकाणी त्यांनी व्यासपीठावर येणंही टाळलं. मनसेतर्फे विविध ठिकाणी वेगवेगळे उपक्रम त्यांनी राबवले, सोशल सर्व्हिस केली, नवी मुंबई मनपा कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी त्यांनी मोर्चाही काढला, रेल्वेचे प्रश्न मांडण्यासाठी अधिकाऱ्यांच्या भेटी-गाठी घेतल्या, आरेतील वृक्षतोडीविरोधातही आवाज उठवला मात्र स्वत: पडद्यामागे राहणंच पसंत केलं.


त्यामुळे आता ही मोठी जबाबदारी नक्की काय असेल याकडे सर्वांचं लक्ष आहे. राज ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेट आणि आता अमित ठाकरेंचं लॉन्चिंग, अशा विविध गोष्टींमुळे मनसे सध्या चर्चेत आहे. तेव्हा अमित ठाकरे मनसेसाठी लकी चार्म ठरणार का हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.


संबंधित बातम्या 

एक ठाकरेपुत्र वडिलांच्या शपथविधीच्या तयारीत तर दुसऱ्याने काढला कामगारांसाठी मोर्चा 

आरेसाठी 'राज'पुत्र आखाड्यात, अमित ठाकरेंचा 'सेव्ह आरे'चा संदेश देणारा व्हिडीयो व्हायरल