Dhule News : धुळे शहरासह जिल्ह्यात विघ्नहर्ता (Dhule Ganesh Utsav) गणरायाला भक्तिपूर्ण (Ganesh Utsav) वातावरणात निरोप देण्यात आला. रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यात विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. विसर्जन मिरवणुका निर्विघ्नपणे पार पडल्याने पोलीस प्रशासनाने देखील सुटकेचा निश्वास सोडला असून कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. जिल्ह्यात 400 सार्वजनिक गणेश मंडळांनी गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप दिला.
धुळे शहरासह जिल्ह्यात विघ्नहर्ता गणरायाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. काल अनंत चतुर्दशीला ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकांनी शहरासह जिल्ह्यातील वातावरण भक्तीमय झाले होते. जिल्ह्यात 400 हून अधिक सार्वजनिक गणेश मंडळांनी गणरायाची स्थापना केली होती. काल सकाळपासून निघालेल्या विसर्जन मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. यावेळी पांजरा नदी पात्रात देखील घरगुती गणरायाचे नागरिकांनी भक्तिमय वातावरणात विसर्जन केले.
मानाच्या खुनी गणपतीचे विसर्जन
धुळे शहरातील एकमेव असलेला मानाचा खुनी गणपतीचा विसर्जन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.या विसर्जन मिरवणुकीत विविध पोलीस अधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
विसर्जन मिरवणुकीदरम्यान कडेकोट पोलीस बंदोबस्त
शहरासह जिल्ह्यात विघ्नहर्ता गणरायाला भव्य मिरवणुका काढून निरोप देण्यात आला. यावेळी शहराच्या विविध भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी विसर्जन मिरवणुकीच्या मार्गाची जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी पाहणी केली.
आनंदखेडा येथे घडली दुर्दैवी घटना
गणेश विसर्जनासाठी गेलेल्या इलेक्ट्रिक इंजिनियर असलेल्या तरुणाचा पांझरा नदीत बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. राकेश अशोक आव्हाड (वय 29, रा आनंदखेडा) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो घरचा गणपती विसर्जनसाठी कुटुंबीयांसह गाव शिवारातील पांझरा नदीवर गेला होता. त्या ठिकाणी पाय घसरल्याने राकेश हा पाण्यात पडला. फरशीपुलाच्या खाली असलेल्या सिमेंट पाईपात वाहून गेल्याने पाईपातील पाण्यात बुडाला. त्यामुळे कुटुंबियांनी एकच आरडाओरड केली. सुमारे 15 मिनिटांनी पाईपाच्या दुसऱ्या बाजूकडून राकेश हा बेशुद्ध अवस्थेत बाहेर निघाल्याने त्यास कुटुंबियांनी ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढले. त्याला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता तेथील डॉ.अरुणकुमार नागे यांनी तपासणी करून मृत घोषित केले.याबाबत रविकांत सानप यांच्या माहितीवरून तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.