Nanar Konkan Refinery Project : कोकणात स्थानिकांच्या विरोधामुळे रखडलेला नाणार रिफायनरी प्रकल्प पुनरुज्जीवनाच्या मार्गावर असल्याचं सूतोवाच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलं आहे. नाणार प्रकल्पाबाबत महाराष्ट्र सरकारचं मनपरिवर्तन होत असल्याचं दिसत असल्याचं प्रधान यांनी म्हटलंय. दैनिक लोकसत्ताच्या मुंबईतील कार्यक्रमात प्रधान यांनी हे वक्तव्य केलंय. नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पात महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत लाखो कोटी रुपयांचं आणि रोजगाराचं योगदान देण्याची क्षमता आहे, असं प्रधान म्हणाले.
धर्मेंद्र प्रधान यांच्या या वक्तव्याबाबत आज विचारलं असता नाणारच्या मुद्द्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, स्थानिकांचं मतपरिवर्तन झाल्याचं ऐकलं नाही. धर्मेंद्र प्रधान आता देशाचे शिक्षणमंत्री आहेत. त्यांनी त्याकडे लक्ष द्यावं, ते चांगले मंत्री आहेत, असं राऊत म्हणाले.
काय म्हणाले धर्मेंद्र प्रधान...
धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबिया यांच्या सहकार्यानं कोकणच्या किनारपट्टीवर 60 लाख टन क्षमतेचा नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचं नियोजन होते. मात्र दुर्दैवानं त्याला विरोध झाला. त्यात बहुमूल्य वेळ वाया गेला आहे. पण आता महाराष्ट्र सरकारचे मतपरिवर्तन होत असल्याचे संकेत मिळत आहेत. प्रकल्पाचा आकार कमी करून तो कोकणातच उभारण्याचा विचार सुरू आहे. देर आए लेकिन दुरुस्त आए या न्यायानं सरकारच्या मतपरिवर्तनाचं स्वागतच केलं पाहिजे.
धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, तेलशुद्धीकरण प्रकल्पामुळे लाखो कोटी रुपये पुढील काही वर्षांत महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत येतील. या प्रकल्पाशी निगडित पूरक उद्योग उभे राहतील आणि त्यातूनही मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होईल. देशालाही पेट्रोकेमिकल क्षेत्रातील या मोठ्या प्रकल्पामुळे ऊर्जा सुरक्षिततेचे ध्येय गाठण्यासाठी मदत होईल, असे धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी स्पष्ट केले.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
इतर संबंधित बातम्या