अमरावती : धामणगाव रेल्वे शहरात तरुणीच्या हत्याप्रकरणात मृत मुलीला त्रास देणाऱ्या ठाणेदाराला अखेर बेड्या ठोकल्या आहेत. दत्तापूरचा ठाणेदार राजेंद्र सोनोनेला अखेर अटक केलं आहे. धामणगाव रेल्वेमध्ये सहा जानेवारीला अल्पवयीन विद्यार्थिनीच्या हत्येप्रकरणी मुलीच्या आईवडिलांनी थेट ठाणेदाराविरुद्ध पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केला होता. या प्रकरणी आई वडिलांनी दिलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत चौकशी केली असता यामध्ये ठाणेदार दोषी आढळल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ठाणेदार राजेंद्र सोनवणे मृतक मुलीच्या घरी जाऊन वारंवार मुलीसोबत लगट करण्याचा प्रयत्न करायचा असं चौकशीत निष्पन्न झाल्याने ठाणेदार राजेंद्र सोनवणे विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आणि त्याला अटकही करण्यात आली आहे.


धामणगाव रेल्वे शहरात सहा जानेवारीला सागर तितुरमारे या माथेफिरूने चाकूचे अनेक वार करून तरुणीची हत्या केली होती. त्यानंतर आरोपी सागर तितुरमारे याने स्वतःलाही चाकूने भोसकून घेतलं होतं. या प्रकरणात ज्या ठाणेदाराकडे आई-वडील आणि मुलगी माथेफिरूची तक्रार घेऊन गेले होते. त्या ठाणेदारांनी तिला सुरक्षा देण्याऐवजी वारंवार फोन करून, अश्लील बोलून, इतकचं नाही तर वारंवार कॉलेजमध्येही भेटायला जात त्रास दिला होता.

धामणगाव रेल्वेतील तरुणीच्या हत्याप्रकरणाला वेगळं वळण; आईवडिलांच्या आरोपांमुळे खळबळ



मुलीच्या आईवडिलांनी ठाणेदाराविरुद्ध पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. हत्येपूर्वी या प्रकरणात आई-वडिलांनी दोन वेळा सागर तितुरमारे मुलीला त्रास देत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्याच्याविरुद्ध हत्येपूर्वी दत्तापूर पोलिसांकडून कठोर कारवाई झाली नसल्याचा गंभीर आरोप मुलीच्या आई-वडिलांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे केला होता.

जुलै 2019 मध्य मुलीला फूस लावून सागर तितुरमारे याने पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या आईवडिलांनी दत्तापूर पोलिसात केली होती. त्यावेळी पोलीस ठाण्याचे ठाणेदार रवींद्र सोनोने यांनी मुलीचा शोध लावून चार दिवसांनी परत आणले होते. त्यानंतर आम्ही दोघे आणि मुलीला नंतरची तक्रार देण्यासाठी ठाण्यात बोलावले होते. पण आमची तक्रार घेऊन माझ्या मुलीचे मेडीकल करा आणि त्या सागर याच्यावर गुन्हा दाखल करा, असे आम्ही दोघांनीही विनंती केली. मात्र, ठाणेदारांनी आम्हाला तसे करू नका तुमच्या मुलीची बदनामी होईल असे सांगितले. तरी पण आम्ही ठाणेदाराला विनंती केली तर त्यांनी माझ्या मुलीला त्यांच्या ऑफिसमध्ये एकटीला घेऊन अडीच तास चर्चा केली आणि आम्ही आई-वडील दोघेही रात्री साडेदहापर्यंत बाहेर थांबून होतो. तरीही त्यांनी गुन्हा दाखल केलाच नाही. उलट आम्हाला सांगितले, की तुम्ही चिंता करू नका, काही होणार नाही, घरी जा मी सांभाळून घेतो, असं ठाणेदारानं म्हटलं होतं, अशी आपबीती मुलीच्या आईवडिलांनी सांगितली होती.

ठाणेदाराकडून मुलीला वारंवार त्रास

मुलीच्या आईवडिलांनी सांगितलं होतं की, यानंतर आम्ही काही दिवसांनी आमच्या मुलीला कॉलेजमध्ये पाठवणे सुरू केले. तेव्हा ठाणेदार हे स्वतः आमच्या घरी येऊन तुमची मुलगी सुंदर आहे, मी तिला पोलिसात लावून देतो असे सांगितले. त्यानंतर त्यांचे घरी या ना त्या कारणावरून जबरदस्ती येणे सुरू झाले. इतकच नाही तर ठाणेदार हे मुलीला भेटण्यासाठी कॉलेजमध्ये जात होते. वारंवार तिला फोन करत होते. शेवटी मुलीने ही बाब तिच्या आईला सांगितले, की आई ठाणेदार खूप वाईट बोलतो फोनवर त्यांना सांग की फोन नका करत जाऊ, तरी ठाणेदार यांनी थातूर-मातूर उत्तर देऊन फोन लावणे सुरूच ठेवले. सहा जानेवारीला सागर तितुरमारे याने मुलीची निर्घृण हत्या केली, असे गंभीर आरोप मुलीच्या आई-वडिलांनी केल्याने एकच खळबळ उडाली होती.