नागपूर : दावोसमध्ये जरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित नव्हते, तरी त्या ठिकाणी त्यांचे अदृश्य हात काम करत होते, असे वक्तव्य उद्योग मंत्री उदय सामंत यांनी अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. महायुती सरकारमध्ये जरी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असले, तरी अनेक लोक त्यांना सुपर सीएम असेही म्हणतात. आज (23 फेब्रुवारी) नागपुरात उद्योग मंत्री उदय सामंत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात जे वक्तव्य केले, हे पाहता महायुती सरकारमध्ये फडणवीस हेच सुपर सीएम असून तेच पडद्यामागून सर्वकाही ठरवत असल्याचे लक्षात आलं आहे.


नागपुरात "पेनॉर्ड रिकार्ड" या वाईन कंपनीसोबत महाराष्ट्राच्या उद्योग विभागाने सामंजस्य करार केले. यावेळी बोलताना उदय सामंत यांनी दावोसमध्ये महाराष्ट्रातल्या पदरात पडलेले विक्रमी सामंजस्य करार संदर्भात पडद्यामागची वेगळीच कहाणी सांगितली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रने आजवरची सर्वाधिक 3 लाख 72 हजार कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक मिळवल्याचे आपण सर्वांनी ऐकले होते. मात्र, उदय सामंत यांनी त्या संदर्भात वेगळाच किस्सा सांगितला.


कोणते एमओयू करायचे आणि कोणते नाही यासंदर्भात फडणवीस निर्देश देत होते


दावोसमध्ये जरी उपमुख्यमंत्री फडणवीस उपस्थित नव्हते, तरी त्या ठिकाणी त्यांचे अदृश्य हात काम करत होते. कोणते एमओयू करायचे आणि कोणते नाही यासंदर्भात फडणवीस सातत्याने निर्देश देत होते असे सामंत म्हणाले. त्यामुळे आजवरचे सर्वाधिक 3 लाख 72 हजार कोटी रुपयांचे एमओयू दावोसमध्ये महाराष्ट्राच्या पदरात पडल्याचे सामंत म्हणाले. सामंत एवढ्यावरच थांबले नाही, तर फडणवीसांनी विदर्भासह महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात उद्योग आणले आहेत. कोकणात तुमचा एक सहकारी म्हणून तुमच्या नेतृत्वात काम करतो, म्हणून माझ्या मतदारसंघातही एखादा उद्योग द्यावा अशी विनंतीही सामंत यांनी यावेळी केली.


इतर महत्वाच्या बातम्या