मुंबई : देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis)  वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत एक मोठा खुलासा केलाय. त्या वादग्रस्त जाहिरातीबद्दल  एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्याच दिवशी चूक मान्य केली, असं फडणवीसांनी स्पष्ट केलंय. जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर दुसऱ्याच दिवशी शिंदेंनी माझ्याशी संवाद साधला आणि आमच्या काही लोकांनी चूक केल्याचे शिंदेंनी सांगितले, असा खुलासा फडणवीसांनी केलाय. या जाहिरातीमुळे भाजप आणि शिवसेना यांच्या दरी निर्माण झाल्याची चर्चा होती. त्यावर आता फडणवीसांनी पडदा टाकलाय. रिपब्लिक  वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.   


13 जून 2023 ला सर्वच वर्तमानपत्रात आलेल्या या जाहिरातीने राज्याचे राजकारण ढवळून निघाले. देशात नरेंद्र आणि राज्यात शिंदे अशा आशयाच्या या जाहिरातीने शिंदे-फडणवीस सरकारमध्ये काही तरी बिनसलं अशी चर्चा सुरू झाली. विरोधकांनी तर हे सरकार पडेल अशी टाईम लाईनच सांगून टाकली. मात्र आता या सर्वांवर खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच पडदा टाकला. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. जाहिरात छापून आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदेंनी माझ्याशी संवाद साधल्याचे फडणवीस म्हणाले. काही वेळा पार्टीत कमी बुद्धीचे लोक असतात. ते चुकीचं काम करतात. पण एवढ्या छोट्या चुकीसाठी आमच्यात मतभेद होतील किंवा सरकार पडेल, असं कुणाला वाटत असेल तर ते कधीही होऊ शकत नसल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.


आम्ही एका विचाराने आणि ध्येयाने हे सरकार स्थापन केलं


देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी राजशिष्टाचार मोडत नाही. मी मुख्यमंत्री म्हणून त्यांना मान सन्मान देतो. ते देखील मला मी  उपमुख्यमंत्री आहे, याची जाणीव मला कधीच होऊ देत नाहीत. आम्हाला दोघांना आमच्या मर्यादा माहिती आहे. त्यामुळे आज वर्ष झाले आम्ही एकत्र आहेत आणि पुढे जात आहे. आमच्यामध्ये मतभेद आहेत लवकरच सरकार पडेल असे अनेकांना वाटते पण असे काही होणार नाही. आम्ही एका विचाराने आणि ध्येयाने हे सरकार स्थापन केलं आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.


जाहिरात मुख्यमंत्री यांना दाखवून दिली नव्हती : केसरकर


दरम्यान देवेंद्र  फडणवीस यांच्या मुलाखतीनंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याही प्रतिक्रिया आल्या आहेत. ही जाहिरात मुख्यमंत्री यांना दाखवून दिली नसल्याची प्रतिक्रिया केसरकर यांनी दिली.तर सुधीर मुनगंटीवार यांनी काही लोक विनाकारण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात काही तरी बिघडलय अशी टूलकीट चालवत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.


हे ही वाचा :


रश्मी ठाकरेंना चौकशीला बोलवणार का? फडणवीस म्हणाले, मैदानात उतरतो तेव्हा कागदपत्र घेऊनच उतरतो!


पहाटेचा शपथविधी हा शरद पवारांचा डाव, त्यांनी आमचा डबलगेम केला : देवेंद्र फडणवीस