Pune Crime News : पुण्यातील सदाशिव पेठेत तरुणीवर झालेल्या हल्ला प्रकरणी आता पोलीस हवालदारासह तीन जणांना निलंबित करण्यात आलं आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्याअंतर्गत पेरुगेट चौकीतील पोलीस हवालदारासह तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला. पोलीस हवालदार सुनील शांताराम ताठे, पोलीस कर्मचारी प्रशांत प्रकाश जगदाळे आणि सागर नामदेव राणे अशी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
हल्ल्याच्या वेळी हाकेच्या अंतरावर असलेल्या पेरुगेट पोलीस चौकीत एकही पोलीस कर्मचारी उपस्थितीत नव्हता. तसंच बीट मार्शल यांनी देखील घटनास्थळी यायला 20 मिनिटं लावली. यामुळे ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त संदीप गिल यांनी दिली आहे.
पुणे पोलीस नक्की करतायत काय? पुणेकरांचा प्रश्न
पुण्यातील सदाशिव पेठेत दर्शना पवार हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता राहिली. महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर तिच्या मित्राने कोयत्याने हल्ला करुन तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. पण एमपीएससीची तयारी करणाऱ्या दोन तरुणांनी प्रसंगावधान दाखवत हल्लेखोर तरुणाला रोखलं. सदाशिव पेठेतील गर्दीच्या ठिकाणी हा प्रसंग घडल्यावर देखील बराच वेळ पोलिसांचा पत्ता नव्हता असं स्थानिकांचं म्हणणं होतं. यामुळे पुण्यातील कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता. पुणे पोलीस नक्की करतायत काय?, असा प्रश्न पुणेकर विचारत होते. अखेर आता याच प्रकरणी पोलिसांचं निलंबन करण्यात आलं आहे.
संबंधित बातमी