मुंबई : अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांच्या संप मागे घेण्याच्या आवाहनाला औषध विक्रेत्यांनी केराची टोपली दिली आहे. या आवाहनानंतरही राज्यभरातील औषध विक्री अजूनही बंद आहे. त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे.


ऑनलाईन फार्मसीला विरोध करत देशभरातील औषध विक्रेत्यांनी संप पुकारला आहे. यात राज्यातील औषध विक्रेतेही सहभागी आहेत.

ई-फार्मसीसाठी औषध विक्रेत्याला सरकार दरबारी नोंदणी करावी लागणार असून औषधांच्या किंमतीची एक टक्का रक्कम सरकारला जाणार आहे. त्याचा फटका ग्राहकांना बसेल तसंच झोपेच्या गोळ्या, ड्रग्ज आणि गर्भपाताची औषधंही सगळ्यांना सहज उपलब्ध होण्याचा धोका आहे.

ई फार्मसीमुळे देशातल्या आठ लाख औषध विक्रेत्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. त्यामुळे सरकारने ई फार्मसीचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली जात आहे.

या बंदनंतरही जर सरकारने दखल घेतली नाही, तर आंदोलनाची दिशा ठरवली जाणार असल्याचा इशारा केमिस्ट असोशिएशन ऑफ ठाणे डिस्ट्रिक्टचे अध्यक्ष दिलीप देशमुख यांनी दिला आहे.