सांगली : मिरजेत सोनसाखळी चोरांनी धुमाकूळ घातला आहे. शनिवारी ब्राम्हणपूरी भागात एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील साठ हजार रुपयांचं गंठण सोनसाखळी चोरांनी लांबवल्याची घटना शनिवारी घडली. गेल्या आठवड्यातील ही दुसरी घटना आहे.
शनिवारी शोभा मंगेश चिटणीस ही महिला एका लग्न समारंभासाठी गेल्या होत्या. दुपारी लग्न समारंभ अटपून त्या घरी परतत होत्या. त्यावेळी एका दुचाकीस्वाराने त्यांच्या गळ्यातील गंठण हिसकावून पोबारा केला. यानंतर चिटणीस यांनी मिरज पोलीस स्थानकात धाव घेऊन, तक्रार दाखल केली.
दरम्यान, ज्या ठिकाणी चिटणीस यांचे गंठण लंपास झाले त्याच परिसरातून गेल्या आठवड्यात सोनसाखळी चोरीच्या दोन घटना घडल्या आहेत. या भागात आंबाबाईचे मंदिर असल्याने परिसरात महिलांचा नेहमी वावर असतो. याच मंदिराशेजारी ही घटना घडल्याने, येथे सीसीटीव्ही बसवण्याची मागणी होत आहे.