Devarshi Narad Award : एबीपी माझाचे प्रतिनिधी दीपक पळसुले यांना उत्कृष्ट वृत्तनिवेदक म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला. विश्व संवाद केंद्रातर्फे देवर्षि नारद या पुरस्कारनं राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आलं. नारद जयंती आणि जागतिक वृत्तपत्र स्वातंत्रदिनाचं औचित्य साधत राजभवनात बुधवारी हा कार्यक्रम पार पडला. पत्रकारिता क्षेत्रात वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया, सोशल मीडियातील प्रतिनिधींना दरवर्षी विश्व संवाद केंद्राच्या पुरस्कार निवड समितीच्या माध्यमातून निवडून हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराचं यंदाचं 24 वे वर्ष होतं.
विश्व संवाद केंद्र, मुंबईच्या वतीने नारद जयंतीच्या निमित्ताने पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या पत्रकारांचा दरवर्षी 'देवर्षी नारद पत्रकारिता सन्मानाने' गौरव करण्यात येतो. यंदाच्या वर्षी या सन्मानासाठी पत्रकारिता आणि समाजमाध्यम क्षेत्राशी संबंधित दहा व्यक्तींची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये एबीपी माझाचे दीपक पळसुळे यांना उत्कृष्ट वृत्तनिवेदक, बाळकृष्ण विष्णू उर्फ प्रमोद कोनकर यांना ज्येष्ठ पत्रकार सन्मान तर झी 24 तास या वाहिनीचे संपादक आणि व्यवसाय प्रमुख डॉ. निलेश खरे यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
उल्लेखनीय लेखनाबद्दलचा सन्मान सकाळ माध्यमाचे प्रवीण टोकेकर तसेच उत्कृष्ट वृत्त विश्लेषण सन्मान MH 48 यूट्युब चॅनलचे अनय जोगळेकर यांना पुरस्कार दिला गेला.
आपल्या खुमासदार सादरीकरणाने कार्यक्रमाची रंगत वाढविणाऱ्या आणि बॉलीवूडकरांना मराठीतून बोलतं करणाऱ्या प्लॅनेट मराठीच्या जयंती वाघधरे यांना उत्कृष्ट सादरीकरण विभागात पुरस्कार दिला गेला. टाईम्स ऑफ इंडियाचे जेष्ठ संपादक वैभव पुरंदरे यांना उत्कृष्ट पत्रकारिता सन्मानाने गौरवण्यात आलं. सोशल मीडिया क्षेत्रातील सन्मानात ट्विटरकरिता अंशुल पांडे, फेसबुककरिता निनाद पाटील, इंस्टाग्रामकरिता हृषिकेश मगर यांना गौरवण्यात आलं.
देवर्षी नारद जयंती कार्यक्रम आणि पत्रकार सन्मान सोहळ्याचे अध्यक्षपद राज्यपाल रमेश बैस यांनी भूषवलं. हा कार्यक्रम बुधवार, ३ मे रोजी दुपारी 12 वा. राजभवनात संपन्न झाला. सन्मानचिन्ह, मानधन, शाल आणि श्रीफळ असे सन्मानाचे स्वरूप आहे.
राज्यपालांनी आपल्या छोटेखानी भाषणात प्रथम आपणास या पुरस्काराच्या निमित्ताने पत्रकारांना भेटण्याची संधी मिळाली आहे हे सांगतानाच आपल्या राजकीय कारकीर्दीत पत्रकारितेशी जवळून संबंध आल्याचे नमूद केले. राजकारणी आणि पत्रकार यांचे नाते आंबटगोड असते हे सांगायला ते विसरले नाहीत. 1975 च्या आणीबाणीत झालेला पत्रकारांवरील अत्याचार जवळून पाहिला असल्याची आठवण त्यांनी सांगितली. वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे बद्दल त्यांनी बदलत्या माध्यमक्षेत्राचा प्रिंट, इलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल आणि सोशल असा विस्तृत आढावा घेतला. सोशल मीडियावरील देशविघातक कंटेंट आणि नरेटिव्हचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. तसेच विश्व संवाद केंद्राच्या पुरस्कार निवड समितीच्या डॉ उदय निरगुडकर, दिनेश गुणे, मृणालिनी नानिवडेकर, आणि किरण शेलार आदी परीक्षक मंडळींनी योग्य निवड केल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन केले.