ABP C Voter Survey On NCP Chief: शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काय होणार, हा मोठा प्रश्न महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणातही कायम आहे. शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडत असल्याची घोषणा करताच सर्वांनाच धक्का बसला. येत्या काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार असून 2024 साली लोकसभेसोबत विधानसभेच्या निवडणुकाही होणार आहेत. अशा वेळी शरद पवारांनी ही घोषणा केली. देशाच्या राजकारणात मोठा दबदबा असलेल्या शरद पवार यांच्या या निर्णयावरून अनेक अर्थही काढले जात आहेत. त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्यांनी निर्णय मागे घेतला नाही तर राष्ट्रवादीचा पुढील अध्यक्ष कोण होणार याकडे मात्र सर्वांचंच लक्ष लागलं आहे. 


अशा राजकीय वातावरणात सी-वोटरने एबीपी न्यूजसाठी सर्वेक्षण केले आहे, हा सर्वे 'एबीपी माझा'चा नाही. या सर्वेक्षणात शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण व्हावे, असा प्रश्न लोकांना विचारण्यात आला होता. लोकांनी आश्चर्यकारक उत्तरे दिली आहेत.


शरद पवारांच्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष कोण व्हावे?


अजित पवार - 34 टक्के
सुप्रिया सुळे - 31 टक्के
दोन्हीही - 26 टक्के
माहित नाही - 9 टक्के


अजित पवारांना सर्वाधिक पसंती 


राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्यापेक्षा अजित पवार यांनाच जनतेची पहिली पसंती असल्याचे सर्वेक्षणाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. एकूण 34 टक्के लोकांनी अजित पवार यांच्या नावाला पंसती दर्शवली आहे. अजित पवार हे शरद पवार यांचे पुतणे असून सध्या ते विधानसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार यांचे मोठे स्थान आहे. ते चार वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत. त्याचवेळी 31 टक्के लोकांनी शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या नावाला पसंती दिली आहे. 


सुप्रिया सुळे या शरद पवार यांच्या कन्या असून त्या बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या खासदार आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी 2 मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती.


दरम्यान, 5 मे रोजी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार असून त्यामध्ये अध्यक्षपदाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण असावा हे ठरवण्यासाठी एका समितीची नियुक्ती करण्यात आली असून या समितीचा निर्णय आपल्याला मान्य असेल असं शरद पवार यांनी या आधीच जाहीर केलं आहे. 


(Disclaimer- एबीपी न्यूजसाठी सी व्होटरने महाराष्ट्राचे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात 1 हजार 638 लोकांशी चर्चा करण्यात आली. 3 मे रोजी हे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणातील त्रुटीचे मार्जिन प्लस मायनस 3 ते 5 टक्के आहे.)


ही बातमी वाचा: