Palkhi Marga : दौंड, बारामती आणि इंदापूर तालुक्यात संत तुकाराम महाराज पालखी (Tukaram Maharaj palkhi marga) महामार्गाचे काम सुरू आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण केले जाईल, असं सांगण्यात आलं आहे. पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्याचा प्रकल्प हाती घेतला होता. या प्रकल्पापैकी 85 टक्के वृक्ष (Planting) सुरक्षित असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिली आहे. त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. 


केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितलं आहे की, महाराष्ट्रातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 965G च्या बारामती इंदापूर क्षेत्रात मोडणाऱ्या संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर आपण फेब्रुवारी आणि मार्च 2022 मध्ये वृक्षारोपण प्रकल्प हाती घेतला होता. या प्रकल्पा अंतर्गत आपण 1025 वटवृक्ष या महामार्गाच्या कडेने लावले होते. या रोपण केलेल्या वृक्षांपैकी 870 वृक्ष (85%) सुरक्षित आणि जीवित असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रोपण केलेले हे वृक्ष अतिशय जोमाने वाढले असल्याचं  गडकरी यांनी सांगितलं. या प्रकल्पामुळे केवळ पर्यावरणाचं संवर्धनच झालं नाही तर या रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या झाडांमुळे सुखद अनुभव घेता येत आहे. त्यासोबतच या रस्त्याची शोभादेखील वाढली आहे. 


संत तुकाराम महाराज पालखी मार्गामुळे शेतकरी सधन


संत तुकाराम महाराज राष्ट्रीय पालखी मार्गाचं काम सध्या सुरु आहे. यामध्ये प्रामुख्याने दौंड, इंदापूर, बारामती भागाचं मोठ्या प्रमाणात भूसंपादन झालं आहे. या मार्गामुळे शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या बदल्यात चांगले पैसे मिळाले आहेत. तसेच बारामती, फलटण असा रेल्वेदेखील जोडण्यात येत आहे. या मार्गासाठीचं भूसंपादनदेखील लवकर केलं जाणार आहे. यातदेखील शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळणार आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनानंतर बाजारात मंदी होती मात्र भूसंपादनाचा मोबदला मिळाल्याने शेतकऱ्यांना फार फटका बसला नाही. 1093 कोटी 29 लाख रुपयांचे वाटप शासनाकडून लाभार्थ्यांना झालेले आहे. त्यामुळे शेतकरी सधन झाले आहे. त्यांनी विविध ठिकाणी प्लॉटिंगदेखील केलं आहे. त्यामुळे जमिनील चांगली किंमत आल्याचं बोललं जात आहे. मात्र बायपास रस्ता जाणाऱ्या मार्गावरील भूसंपदानाचा शेतकऱ्यांना कमी मोबदला मिळाला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे. त्यांनाही इतर शेतकऱ्यांप्रमाणे मोबदला मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.