Nagpur News नागपूर : दीक्षाभूमीवरील (Deekshabhoomi) सौंदर्गीकरण आणि नवीनीकरणाच्या प्रकल्पातील अंडरग्राऊंड पार्किंगच्या मुद्या चांगलाच तापला असून काल या प्रकरणाला हिंसक वळण लागले आहे. दीक्षाभूमी परिसरात नागरिकांनी अंडरग्राऊंड पार्किंगला कडाडून विरोध दर्शवत परिसरात आक्रमक आंदोलन सुरू केले आहे. तसेच दीक्षाभूमी परिसरात मोठ्या संख्येने जमलेल्या संतप्त जमावाने होत असलेल्या विकासकामाच्या साहित्याचीही तोडफोड आणि जाळपोळ केली. त्यानंतर वेळीच पोलिसांनी घटनास्थळी मोठा पोलीस फाटा तैनात करत परिस्थिती नियंत्रणात आणली. परंतु पोलिसांनी पुढे केलेल्या तपासात धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 


दीक्षाभूमी हिंसक आंदोलनात बाहेरच्या आंदोलकांचा समावेश?


नागपूरच्या दीक्षाभूमीवर काल झालेल्या हिंसक आंदोलनात बाहेरून आलेल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील आणि इतर वेगळ्या राज्यातून आलेल्या अनुयायांनी आंदोलनस्थळी येऊन स्थानिकांच्या भावना भडकावल्याची माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे. संतप्त आंदोलकांच्या भावना भडकवल्याने हे आंदोलन अधिक उग्र झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे. परिणामी, दीक्षाभूमीवरील तोडफोड प्रकरणात नागपूर पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरुकेली आहे.


दीक्षाभूमीवरील होत असलेल्या विकासकामसह परिसरात नव्याने उभारण्यात येणाऱ्या अंडरग्राऊंड पार्किंगला बौद्ध अनुयायांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. या विकासकामात दीक्षाभूमी स्मारक समितीने मनमानी करत लोकांना विश्वासात न घेता हे विकासकार्य केल्याचा आरोप बौद्ध अनुयायी आंदोलकांनी केला आहे. परिणामी काल दीक्षाभूमीवर जमलेल्या शेकडो बौद्ध अनुयायांनी याठिकाणी होत असलेल्या बांधकाम साहित्याचे नुकसान आणि जाळपोळ करत आपला रोष व्यक्त केला. त्यानंतर हे आंदोलन अधिक हिंसक होऊ नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी तैनात करण्यात आला.


अशातच राज्यभरातून होत असलेल्या या विकासकामाचा विरोध लक्षात घेता राज्य सरकारने या कामाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. याबाबत अधिकृत घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सभागृहात केली आहे. मात्र आम्हाला जोपर्यंत याबाबत लिखित स्वरूपात आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आपले आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय.


दीक्षाभूमीवर आज पोलिसांचा चोख बंदोबस्त


या प्रकरणाचा पडसाद आज विधिमंडळात उमटले असताना दुसरीकडे नागपूर पोलिसांनी तपासात धक्कादायक माहिती दिली आहे. नागपूरच्या दीक्षाभूमीवर काल झालेल्या हिंसक आंदोलनात बाहेरून आलेल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील आणि इतर राज्यातून आलेल्या अनुयायांनी आंदोलनस्थळी येऊन स्थानिकांच्या भावना भडकावल्याची माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे. स्थानिकांच्या भावना भडकावल्याने आंदोलन आधिक उग्र झाल्याचे  पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले. त्यामुळे आज परत आंदोलनाचा भडका उडू नये यासाठी पोलिसांनी दिक्षभूमी परिसर ताब्यात घेतला असून चोख पोलीस बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आला आहे. राज्य राखीव दल आणि नागपूर पोलिसांच्या तुकड्या दिक्षभूमी परिसरात तैनात करण्यात आल्या आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या


दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगच्या विरोधात नागरिकांचा आक्रमक पवित्रा; विकासकामाला स्थगिती, मात्र नेमका वाद काय?