मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. पुढील दोन दिवसांत राज्यातील तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. सातारा जिल्ह्यातील वेण्णालेकमध्ये 4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. राज्यातील हे सर्वात निचांकी तापमान आहे. वेण्णालेक खालोखाल महाबळेश्वरचे तापमान 7 अंश सेल्सिअसवर घसरले आहे.
महाबळेश्वर पाठोपाठ वाईच्या किमान तापमानातही घट झाली आहे. संपूर्ण वाईसह कृष्णा नदीवर धुक्याची चादर पसरली आहे. नंदूरबार जिल्ह्यात 7अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. सातपुड्याच्या पर्वत रांगांमधील डाब परिसरात दवबिंदू गोठले आहेत.
धुळे जिल्ह्यातही किमान तापमानात घट झाली आहे. धुळ्याचे तापमाण 7.2 अंश सेल्सिअस झाले आहे. तसेच जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने पावसाची देखील शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नाशिक येथे 7.3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर जळगावात 9 अंश किमान तापमान नोंदविले गेले. काल दिवसभर वातावरणात प्रचंड गारवा जाणवत होता.
दरम्यान, वातावरणात गारठा कायम असल्याने नागरिकांनी घराबाहेर न पडणे पसंत केले आहे. ढगाळ वातावरणाचा पिकांवर परिणाम होणार असून पुढील 2 दिवस वातावरणातील गारठा कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
लातुरात पावसाची हजेरी
एकीकडे थंडी वाढली असतानाच आज पहाटे लातूर शहर आणि ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावली होती. 20 ते 25 मिनिटे शहरात चांगला पाऊस झाला.
नागरपुरात पाऊस
नागपूर शहरात आज सकाळी पाऊस झाला. सकाळपासून ढगाळ वातावरण आणि धुकं असताना शहरात साडे आठ वाजता मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली. हवामान विभागाने आधीच पूर्व विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती. गेल्या दोन दिवसांपासून पूर्व विदर्भात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस होत असून रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल आणि नरखेड तालुक्यात सर्वाधिक पिकांचे नुकसान झाले आहे.
महत्वाच्या बातम्या