पालघर : पालघर लोकसभेचे महायुती उमेदवार राजेंद्र गावित आणि ठाणे लोकसभेचे युतीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारसभेसाठी आज गृहमंत्री राजनाथ सिंह सहभागी झाले होते. भारताच्या गृहमंत्र्यांच्या सभेत हद्दपार गुंडाच्या एन्ट्रीने पालघर पोलिसांच्या एकूण सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.


केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सभेच्या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. बॉम्बशोधक पथक, डॉग स्कॉड, तसेच पालघर पोलिसांकडून पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, चार पोलीस उपअधीक्षक, 50 पोलीस अधिकारी, 500 पोलीस कर्मचारी, आरसीपीच्या तीन टीम असा तगडा बंदोबस्त होता. मात्र तरीही या सभेत पोलिसांनी हद्दपार केलेल्या गुंडाला आत सोडलं. संजय बिहारी असं या हद्दपार केलेल्या गुंडाचं नाव आहे. पक्षाची टोपी आणि मफलर घालून, सभेच्या ठिकाणी तो उभा होता. त्यामुळे एवढ्या मोठ्या व्हीआयपी व्यक्तीच्या सुरक्षेत पोलिसांचं असं दुर्लक्ष सध्या मोठा चर्चेचा विषय बनला आहे.

पालघर लोकसभेचे युती उमेदवार राजेंद्र गावित आणि ठाणे लोकसभेचे युतीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारसभेसाठी आज गृहमंत्री राजनाथ सिंह आले होते.  पालघर लोकसभेच्या नालासोपारा येथे आणि ठाणे लोकसभेच्या मीरा रोड येथे राजनाथ सिंह यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.

या दोन्ही सभेत राजनाथ सिंह यांनी महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचं आवाहन केलं. मोदी सरकारकडून केलेली विकास कामं सर्जिकल स्टाईक, अर्थ व्यवस्था इत्यादी मुद्दे लोकांसमोर ठेवत आपल्या कामांचा लेखाजोखा त्यांनी यावेळी मांडला.

काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सय्यद बोलले की जम्मू काश्मीरमध्ये वेगळा पंतप्रधान होणार, म्हणजे भारतात दोन पंतप्रधान करण्याचे स्वप्न बघत असाल तर काश्मीर मधील कलम 370 आणि 35 A समाप्त करण्याशिवाय आमच्याकडे कुठलाच मार्ग नसेल असा इशारा राजनाथ सिंह यांनी यावेळी दिला.